अकोला : रेल्वेच्या अनारक्षित तिकिटाच्या लांबच लांब रांगेत नेहमीच उभे राहून कंटाळा आहात? तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. रेल्वेने अनारक्षित तिकीट काढण्यासाठी यूटीएस ॲपचा हायटेक पर्याय उपलब्ध करून दिला आहे. या माध्यमातून तिकीट घेतल्यास रांगेत उभे राहण्याचे कष्ट टाळण्यासोबतच तीन टक्के बोनस देखील मिळत आहे. रेल्वेच्या भुसावळ विभागात जानेवारीमध्ये तब्बल २.५७ लाख प्रवाशांनी यूटीएस ऑन मोबाइल ॲपचा वापर करून तिकीट घेतले. प्रवाशांसाठी यूटीएस ऑन मोबाइल ॲप वेळ आणि संसाधनांची बचत करणारे प्रभावी साधन ठरत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भुसावळ विभागामध्ये अनारक्षित तिकीट खरेदीची प्रक्रिया सोपी आणि जलद करण्यासाठी यूटीएस ऑन मोबाईल ॲप प्रवाशांसाठी उपयुक्त ठरत आहे. जागरूकता अभियान आणि डिजिटल सेवांच्या प्रोत्साहनामुळे हे ॲप प्रवाशांसाठी फायदेशीर ठरत आहे. जानेवारी महिन्याचे भुसावळ विभागात २.५७ लाख प्रवाशांनी यूटीएस ऑन मोबाईल ॲपचा वापर केला. याद्वारे भुसावल विभागाला ६६.२२  लाखांचामहसूल प्राप्त झाला. यामुळे रेल्वे स्थानकांवरील अनारक्षित तिकीट खिडकीवरील लांब रांगेतून प्रवाशांची सुटका झाली. वेळेची देखील मोठी बचत झाली.

अनारक्षित तिकीट बुकिंग, मासिक सीझन तिकीट जारी करणे व नूतनीकरण, पेपर व पेपरलेस तिकीट पर्याय, आर-वॉलेटची शिल्लक तपासणे आणि परतावा सुविधा, प्रोफाइल अपडेट आणि बुक केलेल्या तिकीटांचा तपशील आदी सुविधा ॲपवर उपलब्ध आहेत. भुसावळ विभागातील सर्व रेल्वे स्थानकांवर यूटीएस ऑन मोबाईल ॲपची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. ॲपच्या माध्यमातून अत्याधुनिक सुविधांचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस चांगलीच वाढत असल्याचे दिसून येत आहे. या डिजिटल सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले. 

ॲपचे फायदे का?

मोबाईल तिकीटिंग ॲपमुळे तिकीट खरेदीसाठी खिडकीवर दीर्घ प्रतीक्षा करण्याची गरज नाही. कुठूनही, कधीही तिकीट बुक करता येते. पर्यावरणपूरक तिकीटचा अनुभव, डिजिटल पेमेंटसह तिकीट बुक करणे सुलभ होते.

असा करा ॲपचा वापर ॲप गूगल प्ले स्टोअर, विंडोज स्टोअर किंवा ॲपल स्टोअरमधून डाउनलोड केला जाऊ शकतो. ॲपवर मोबाईल नंबरसह साइन अप करा. लॉगिन करा आणि आर-वॉलेट वापरून तिकीट बुक करा. आर-वॉलेट रिचार्जवर रेल्वेकडून तीन टक्के बोनस दिला जातो.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Railways made available high tech option of uts app for booking unreserved tickets ppd 88 zws