पक्ष्यांचा अधिवास नष्ट झाला की, सामान्य पक्षीदेखील असामान्य कसा होऊन जातो, याचे उत्तम उदाहरण म्हणजे ‘स्कीमिटर बॅबलर’ हा पक्षी आहे. तापी नदी ते दक्षिण गुजरातपर्यंत त्याचा अधिवास पसरला आहे, तरीही मध्यभारतात तो दुर्मीळच आहे. अशा ‘स्कीमिटर बॅबलर’ने जैवविविधतेने समृद्ध मेळघाटात पहिल्यांदाच पाऊल ठेवले. धनंजय भांबूरकर यांनी छायाचित्रासह त्याची नोंद घेण्यात यश मिळवले.
तापी नदी, सिपना नदीचे खोरे हा त्याचा अधिवासाचा एक भाग असला तरीही या परिसरात त्याचे अस्तित्व गेल्या कित्येक वर्षांत आढळले नाही. पक्ष्यांची नोंद करणाऱ्या पक्षी अभ्यासकांनाही तो आढळलेला नसल्याने म्हणूनच पक्ष्यांच्या नोंदी ज्या ज्या ठिकाणी केल्या जातात, त्या त्या ठिकाणीही त्याची नोंद नाही. महाराष्ट्र, गोवा, ओडिशा, पूर्व घाटातील कृष्णा नदीचा परिसर, ही त्याची अधिवासाची प्रमुख ठिकाणे आहेत. मात्र, त्याचा अधिवास बऱ्याच ठिकाणी खंडित झाल्यामुळे कधीही स्थलांतर न करणाऱ्या या पक्ष्याला आता नवा अधिवास शोधावा लागत आहे. परिणामी, या पक्ष्याचे क्षेत्रही वाढत चालले आहे. त्याचा प्रत्येक अधिवास म्हणजे, त्या प्रत्येक अधिवासात त्याचे नाव वेगळे, हे जणू अलीकडच्या काळात समीकरणच झाले आहे. एरवी पक्ष्यांची नावे भरपूर असतात, पण नव्या क्षेत्रात नवे नाव, असे दिसून येत नाही. ‘स्कीमिटर बॅबलर’ म्हणजे विदर्भात खापऱ्या चोर, तर नाशिकमध्ये भूरकोंबडी म्हणून ओळखला जातो. मराठीत मात्र याला बाकचोच सातभाई म्हणतात आणि ‘पामोटोऱ्हीनस होर्सफिल्डी’ असे त्याचे शास्त्रीय नाव आहे. सामान्य असूनही असामान्य, अशी त्याची ओळख झाल्याने म्हणजेच तो दुर्मीळ असल्यामुळे त्याची फारशी माहितीच उपलब्ध नाही.

मंजूळ आवाजाचा पक्षी
अवघा २२ से.मी, लांबीच्या या छोटय़ा पक्षाची विशेष ओळख म्हणजे मुळाशी काळसर असलेली आणि खालच्या बाजूला वाकलेली पिवळ्या रंगाची चोच आहे. पोट आणि छाती पांढऱ्या रंगाची, तर पंख आणि शरीर लालसर करडय़ा रंगाचे आहे. डोके लांबट आणि डोळ्यावर पांढरा लांब पट्टा असतो. झाडाच्या खोडावरील सालीआड आणि उघडय़ा मुळांवरील कीटक त्याचे प्रमुख खाद्य आहे. ते नेमकेपणाने टिपता यावे म्हणून निसर्गदत्त लांब आणि वक्र चोच सहाय्यकारी ठरते. अतिशय मंजूळ आवाज असलेल्या या पक्ष्याचे वास्तव्य घनदाट जंगलात असते. डिसेंबर ते मे हा त्याचा मिलनाचा काळ आहे. इतर पक्ष्यांसारखा तोही घरटी बांधतो, पण जमिनीवर किंवा झुडपांमध्ये अस्ताव्यस्त असे त्याचे घरटे असते.