rss will not agitate for gyanvapi mosque says chief mohan bhagwat zws 70 | ‘ज्ञानवापी’साठी रा.स्व. संघ आंदोलन करणार नाही! सरसंघचालक भागवत यांची भूमिका | Loksatta

‘ज्ञानवापी’साठी रा.स्व. संघ आंदोलन करणार नाही! सरसंघचालक भागवत यांची भूमिका 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने नागपुरातील रेशीमबाग मैदानात आयोजित तृतीय वर्ष वर्गाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते

mohan-bhagwat-1200-5
डॉ. मोहन भागवत (संग्रहित छायाचित्र)

नागपूर : ज्ञानवापी मशिदीसंदर्भात जो इतिहास आहे, त्याला आम्ही बदलू शकत नाही. मात्र, त्यावर वाद निर्माण करून दररोज नवनवे पुरावे सादर केले जात आहेत. आम्हाला अयोध्येतील राम मंदिरानंतर कोणतेही आंदोलन करायचे नाही. ज्ञानवापीबाबत मुस्लीम व हिंदूंनी न्यायालयाचा निर्णय मान्य करावा, असे आवाहन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्यावतीने नागपुरातील रेशीमबाग मैदानात आयोजित तृतीय वर्ष वर्गाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. सरसंघचालक म्हणाले, प्राचीन काळात बाहेरून आलेल्यांनी आक्रमणे करून मंदिरे तोडली. त्यामुळे ज्ञानवापीबाबत दोन्ही समाजाने आपसात निर्णय करावा. मात्र, तसे होत नाही. आम्ही राम जन्मभूमी आंदोलनात सहभागी झालो, पण आता कोणत्याही आंदोलनात उतरणार नाही. याप्रकरणी न्यायालय जो निर्णय देईल तो पाळायला हवा.

दोन्ही समाजांनी परस्परांचा सन्मान करावा

मशिदीत शिवलिंग आढळल्यामुळे ते मंदिर आहे, असे वाटते. दोन्ही धर्माचे पूजाविधी वेगळे असले तरी आपण वेगळे आहोत, असे त्यांनी समजू नये. आपण एकाच देशाचे आहोत, हे लक्षात ठेवावे. दोन्ही समाजाने परस्परांचा सन्मान करावा, असेही भागवत म्हणाले.

विश्वगुरू बनण्याची ताकद भारतात आहे आणि यासाठी संघ प्रयत्न करत आहे, असे भागवत यांनी सांगितले. दोन वर्षे करोनामुळे हा कार्यक्रम होऊ शकला नाही, मात्र संघाचे काम थांबले नाही. करोना रुग्णांच्या सेवेत संघ होता, याकडे भागवत यांनी लक्ष वेधले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना कमलेश पटेल म्हणाले, समन्वय, समर्पण आणि एकात्मता संघातून शिकायला मिळते. भारत मातेसाठी आम्ही काय करू शकतो, याचा विचार केला पाहिजे. प्रास्ताविक महानगर संघचालक राजेश लोया यांनी केले. सर्वधिकारी अशोक पांडे यांनी वर्गाची माहिती दिली. प्रारंभी स्वयंसेवकांच्या कवायती व पथसंचलन करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भाग्यनगर येथील श्रीरामचंद्र मिशनचे अध्यक्ष दाजी उपाख्य कमलेश पटेल, महानगर संघचालक राजेश लोया, वर्गाचे सर्वाधिकारी अशोक पांडे आणि विदर्भ प्रांत संघचालक राम हरकरे उपस्थित होते.

हिंदूंनी खूप सहन केले..

हिंदूंनी खूप सहन केले, देशाचा तुकडासुद्धा गमावला. हिंदूंना कोणाला जिंकायचे नाही, हरवायचे पण नाही. भीती दाखवायची नाही, पण घाबरायचेही नाही. तरी समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना उत्तर द्यावेच लागेल, असेही भागवत यांनी नमूद केले.

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-06-2022 at 02:54 IST
Next Story
बनावट न्यायालयीन दस्तावेज बनवणारी टोळी जेरबंद; जिल्हा न्यायालयासमोरच सुरू होता प्रकार