मंगेश राऊत

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

उपराजधानीतील शिवसैनिकांमध्ये असलेला असंतोष शमण्याची चिन्हे नसून आता आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या कार्यपद्धतीवर सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त होत आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केलेले व महानगरप्रमुख पदाची जबाबदारी सांभाळणारे प्रमोद मानमोडे केवळ नाममात्र असल्याची माहिती समोर येत आहे.

दुष्यंत चतुर्वेदी हे शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर व आमदार म्हणून निवडून आल्यानंतर शहरातील शिवसेनेत मोठे फेरबदल झाले. पक्ष नेतृत्वाने जुनी कार्यकारिणी बरखास्त करून नवीन कार्यकारिणी जाहीर केली. काही दिवसांपूर्वी चतुर्वेदी यांच्या नेतृत्वात निर्मल उज्ज्वल को ऑपरेटिव्ह बँकेचे संचालक प्रमोद मानमोडे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. काही दिवसांतच त्यांच्याकडे पक्षाने महानगर प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली.  नवीन कार्यकारिणीही जाहीर झाली. त्यावर सतीश हरडे, शेखर सावरबांधे आणि बंडू तागडे आदी माजी शहरप्रमुखांसह दोनशेवर कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करून राजीमाने दिले. नवीन कार्यकारिणीत जुन्या शिवसैनिकांना डावलून नवीन कार्यकर्त्यांना महत्त्वाचे स्थान देण्यात आले, असा आरोप करण्यात आला. दरम्यान, अनेक नाराज शिवसैनिकांनी नवीन महानगरप्रमुखांशी संपर्क साधला. तेव्हा शिवसैनिकांच्या असे लक्षात आले की, नव्याने जाहीर झालेली कार्यकारिणी आमदार दुष्यंत चतुर्वेदी आणि प्रसिद्धीप्रमुख नितीन तिवारी यांच्या संगनमताने निश्चित झाली. यावरून  प्रमोद मानमोडे यांची भूमिका केवळ नाममात्र असून त्यांचे सर्व अधिकार आमदार चतुर्वेदी वापरत असल्याची चर्चा जुन्या शिवसैनिकांमध्ये आहे. आजवर महानगरप्रमुख असे कुणाच्या हातचे बाहुले बनून राहिले नव्हते. त्यामुळे महानगरप्रमुखांनी स्वत:च्या अधिकारांचा वापर करून जुन्या शिवसैनिकांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी राजीनामा देणाऱ्या अनेकांनी लोकसत्ताशी बोलताना केली आहे. यासंदर्भात महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.

सर्व बैठका खासगी कार्यालयात

शिवसेनेसंदर्भात निर्णय घेताना शिवसेना पक्ष कार्यालयात बैठका होणे अपेक्षित आहे. पण, महानगर प्रमुख प्रमोद मानमोडे किंवा आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्याकडून पक्ष कार्यालयात बैठकाच घेण्यात येत नसून सर्व बैठका चतुर्वेदी यांच्या खासगी कार्यालयात होत आहेत. बहुतांश बैठकांना मानमोडे यांनाही न बोलावता निर्णय जाहीर करण्यात येत असल्याची माहितीही शिवसैनिकांकडून मिळाली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shiv sena mayor only nominal all decisions from dushyant chaturvedi abn