नागपूर : लाखो शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन व्यवस्थापन करण्यासाठी २०१२ मध्ये सुरू झालेल्या ‘शालार्थ प्रणाली’चे ‘पासवर्ड’ बदलण्यास ‘ओटीपी’सारखे (वन टाइम पासवर्ड) कुठलेही सुरक्षा कवच नसल्याने शिक्षक भरती घोटाळा झाल्याची माहिती समोर आली आहे. घोटाळा उघडकीस येण्याच्या एका महिन्यापूर्वी ‘ओटीपी’चा पर्याय देण्यात आला होता.
शिक्षण संस्थांमध्ये रूजू होणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्याला ‘शालार्थ प्रणाली’ देण्याचा अधिकार विभागीय शिक्षण उपसंचालकांना देण्यात आला. ‘प्रणाली’चे ‘लॉगिन’ आणि ‘पासवर्ड’ शाळा आणि वेतन अधीक्षकांकडे असतात. परंतु, ‘पासवर्ड’ बदलण्यासाठी आतापर्यंत कुठलेही सुरक्षा कवच नसल्याची माहिती पुढे आली आहे.
‘एसआयटी’चा निर्णय मुख्यमंत्री घेणार!
शिक्षक भरती घोटाळ्याची चौकशी ही विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) घेण्यात यावी, अशी मागणी सर्वच स्तरातून सुरू आहे. परंतु, शासनाकडून अद्यापही यावर कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही. यासंदर्भात शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले की, ‘एसआयटी’ नेमण्याचा अधिकार हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेणार आहेत.