उपग्रह टॅगिंग केलेल्या तीन कासवांचा संपर्क तुटला ; बॅटरीत बिघाडाची शक्यता

मे महिन्यात प्रथमा आणि त्यानंतर लगेच सावनी या दोन मादी ऑलिव्ह रिडले कासवांचाही संपर्क तुटला.

turtule
(संग्रहित छायाचित्र)

नागपूर : राज्यात पहिल्यांदाच ऑलिव्ह रिडले कासवांवर उपग्रह टॅगिंग करुन त्यांच्या समुद्रभ्रमंतीचा मार्ग शोधण्याचा प्रकल्प वनखात्याच्या कांदळवन कक्षाने राबवला. सुरुवातीला या प्रकल्पाचे चांगले परिणामदेखील दिसून आले. मात्र काही तांत्रिक अडचणी या कासवांच्या भ्रमंतीचा मार्ग शोधण्यात अडथळा ठरत आहेत. आता तीन कासवांचा संपर्क तुटला आहे.

वनखात्याच्या कांदळवन कक्षाने डेहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेच्या सहकार्याने पाच ऑलिव्ह रिडले कासवांना उपग्रह टॅगिंग केले. हे कासव किती दूपर्यंत प्रवास करतात याचा अभ्यास करणे हा हेतू या ‘टॅगिंग’मागे होता. दरम्यान, पाचपैकी लक्ष्मी या मादी ऑलिव्ह रिडले कासवाचा संपर्क मार्च महिन्यात तुटला. मे महिन्यात प्रथमा आणि त्यानंतर लगेच सावनी या दोन मादी ऑलिव्ह रिडले कासवांचाही संपर्क तुटला. त्यांच्याकडून मिळणारे संकेत बंद झाले. त्यामुळे या कासवांच्या मृत्यूची शंकादेखील व्यक्त करण्यात आली. तसेच मासेमारीच्या जाळय़ात किंवा समुद्रातील शेवाळात अडकून ट्रान्समीटर बंद पडल्याचीदेखील शक्यता व्यक्त करण्यात आली. मात्र त्यांचा मृत्यू झाला नसून ट्रान्समीटरमध्ये लावण्यात आलेल्या बॅटरीमध्ये बिघाड झाला असण्याची शंका शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. 

कांदळवनसाठी जसा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे, तसाच तो आमच्यासाठीदेखील आहे. त्यामुळे संपर्क तुटल्यानंतर आमचीही थोडी निराशा झाली आहे. हा सर्व खेळ ट्रान्समीटरच्या बॅटरीवर अवलंबून आहे. बॅटरीची क्षमता ५०० दिवस चालेल इतकी होती, पण १३० दिवसांतच संपर्क तुटत आहे. याचाच अर्थ बॅटरीमध्ये समस्या आहे. म्हणूनच आम्ही न्युझिलंडमधील ‘सीरट्रॅक’ या कंपनीला मेल केला असून त्यांच्याकडून येणाऱ्या उत्तराची वाट बघत आहोत. न्युझिलंडमधील या कंपनीकडून तयार करण्यात आलेल्या इतर ट्रान्समीटरबाबतही हाच अनुभव आहे.

 – डॉ. सुरेश कुमार, शास्त्रज्ञ, भारतीय वन्यजीव संस्था, डेहरादून

एका ट्रान्समीटरसाठी पावणेदोन लाखांचा खर्च..

प्रथमा, लक्ष्मी, सावनी, रेवा आणि वनश्री या पाच ऑलिव्ह रिडले कासवांपैकी पहिल्या तीन कासवांच्या उपग्रह टॅगिंगच्या ट्रान्समीटरसाठी आर्थिक साहाय्य कांदळवन कक्षाने, तर शेवटच्या दोन कासवांसाठी भारतीय वन्यजीव संस्थेने  केले. एका ‘ट्रान्समीटर’साठी १ लाख ७५ हजार रुपये खर्च करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व नागपूर/विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Three turtles with satellite tagging lost contact zws

Next Story
नागपूर :उमेश कोल्हे हत्याकांडातील आरोपीला नागपुरातून अटक
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी