नवीन वीज मीटरसाठी दोन महिन्यांची प्रतीक्षा!

महावितरणकडून जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात राज्यात केवळ ८३ हजार ८७१ मीटरच उपलब्ध केले गेले

light-meter-veej-meter
(संग्रहित छायाचित्र)

महेश बोकडे, लोकसत्ता

नागपूर :नागपूर : राज्यात मागणीच्या तुलनेत नवीन वीज मीटर उपलब्ध करण्यात महावितरण अपयशी ठरत आहे. त्यामुळे अनेक भागात नवीन वीज मीटर व नवीन वीज जोडणीसाठी ग्राहकांना एक ते दोन महिन्यांची प्रतीक्षा करावी लागत आहे. नादुरुस्त मीटरही बदलले जात नसल्याने ग्राहकांना अवास्तव सरासरी देयक भरूनसुद्धा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

महावितरणकडे वीज मीटरचा तुटवडा असून ग्राहकांना अवास्तव किमतीत खासगी प्रतिष्ठानांतून वीज मीटर खरेदी करावे लागत आहेत. ग्राहकांच्या लुटीचा हा प्रकार ‘लोकसत्ता’ने पुढे आणला होता. त्यावर महावितरणने सप्टेंबर २०२२ पर्यंत १५ लाख नवीन मीटर पुरवठादाराकडून मिळणार असल्याचा दावा केला. त्यानुसार मे महिन्यात दोन लाख, जून ते सप्टेंबपर्यंत प्रत्येक महिन्यात ३ लाख २७ हजार ५०० मीटर उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात कमी मीटर मिळाल्यामुळे सर्वत्र तुटवडा जाणवत आहे.

महावितरणकडून जून महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात राज्यात केवळ ८३ हजार ८७१ मीटरच उपलब्ध केले गेले. त्यामुळे वीज जोडणीसाठी नवीन मीटर तर सोडाच, बऱ्याच भागात नादुरुस्त मीटरही एक ते दोन महिने वा त्याहून अधिक काळापर्यंत बदलले जात नाही. असे असतानाही ग्राहकांना या नादुरुस्त मीटरचे सरासरी अव्वाच्या सव्वा देयक दिले जात असल्याच्या तक्रारी ग्राहकांकडून केल्या जात आहेत.

महावितरण ग्राहकांना नवीन व  दोषमुक्त मीटर उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरत असताना त्याचा भुर्दंड ग्राहकांना का, असा प्रश्न विचारला जात आहे.

महावितरण काय म्हणते?

मीटर तुटवडय़ाबाबत विचारणा करण्यासाठी महावितरणचे मुख्य अभियंता (सामग्री व्यवस्थापन) मनीष वाठ यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही. मुख्य जनसंपर्क अधिकारी अनिल कांबळे यांनी जास्त बोलणे टाळून आवश्यक पुरवठा करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा दावा केला.

वर्षांला किती मीटर हवे?

महावितरणकडून दरवर्षी सुमारे ८ ते ९ लाख नवीन वीजजोडण्या दिल्या जातात. सोबतच नादुरुस्त व इतर कारणांमुळे मीटर बदलले जातात. यासाठी महावितरणला दरमहा २ लाख मीटरची आवश्यकता असते. परंतु मीटरचा पुरवठा कमी असल्याने हे काम करताना  स्थानिक अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक होत आहे.

‘‘संघटनेने राज्यात वीज मीटरचा तुटवडा असल्याचे महावितरणच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर १२ लाख मीटर खरेदीचा निर्णय झाला होता. त्यातील काही मीटरचा पुरवठाही झाला. परंतु मागणीच्या तुलनेत ते कमी होते. प्रत्यक्षात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मीटर खरेदीत दिरंगाई केल्याने सर्वत्र मीटरचा तुटवडा जाणवत असून ग्राहकांना तीन ते चार महिने प्रतीक्षा करावी लागत आहे. नादुरुस्त मीटरही बदलले जात नसल्याने ग्राहकांना सरासरी देयक दिले जात आहे. यामुळे ग्राहकांमध्ये रोष असून त्याचा सामना कर्मचाऱ्यांना करावा लागत आहे.’’

कृष्णा भोयर, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशन.

मराठीतील सर्व नागपूर/विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Two months waiting for new electricity meter zws

Next Story
आता मेल, एक्सप्रेस रेल्वेगाडय़ांतून सर्वसाधारण तिकिटावर प्रवास ; २९ जूनपासून सुविधा सुरू होणार
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी