बसप प्रमुख मायावतींचे प्रतिपादन
भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेशी आम्ही सहमत नाही, असे प्रतिपादन बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी केले.
आज सोमवारी इंदोरा मैदानावर आयोजित प्रचारसभेत त्या बोलत होत्या. मायावती म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशातील सर्व धर्माचा विचार करून राज्यघटनेला आकार दिला. यात केवळ हिंदूचा विचार नाही. कारण, भारत हिंदू राष्ट्र नव्हे तर धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. भारतातील मुस्लीम हिंदू संस्कृतीमुळे आनंदी आहेत, सरसंघचालकांच्या मताशीदेखील आम्ही सहमत नाही. त्यांनी असे मत व्यक्त करण्यापूर्वी सच्चर आयोगाचा अहवाल एकदा नजरेखालून घालावा. त्यानंतर त्यांना वस्तुस्थिती कळेल, असेही त्या म्हणाल्या.
केंद्र सरकारने राज्यघटनेतील अनुच्छेद ३७० काढून घेण्याचा निर्णय घेतला. बसपाने त्याचे समर्थन केले. डॉ. आंबेडकर हे राष्ट्राची एकता आणि अखंडतेचे समर्थक होते. आमची देखील तीच भूमिका आहे. त्यामुळे या निर्णयाला बसपने पाठिंबा दिला. परंतु याचा अर्थ केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाचे समर्थन केले जाईल, असा नव्हे. सरकारच्या धोरणामुळे गरीब, कामगारांची स्थिती आणखी वाईट होत असून उद्योजकांना लाभ होत आहे. चुकीच्या आर्थिक धोरणामुळे महागाई, बेरोजगारी आणि गरिबी वाढली आहे. खासगी क्षेत्रात जातनिहाय आरक्षणाची तरतूद न करताच सार्वजनिक क्षेत्रातील वेगवेगळ्या कंपन्यांचे खासगीकरण केले जात आहे. त्यामुळे आरक्षण प्रभावहीन झाले आहे. सरकारी नोकरीतील पदोन्नतीतील आरक्षण देखील प्रभावहीन झाले आहे, याकडेही मायावतींनी लक्ष वेधले.
योग्यवेळी धर्मातर
मायावती यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच धर्मातराचा विषय काढला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धम्म दीक्षा घेण्याची प्रतिज्ञा बरीच वर्षे आधी केली होती. लोकांमध्ये जनजागृती केल्यानंतर त्यांनी नागपुरात दीक्षा घेतली. मी देखील लोकांमध्ये जागृती निर्माण करीत आहे. योग्यवेळी देशभरातील अधिकाधिक लोकांसमवेत दीक्षा घेणार आहे, याचा पुनरुच्चार मायावती यांनी केला.