गडचिरोली : नक्षल चळवळीत आंध्र-ओडिशा सीमावर्ती भागात संरक्षण दल कमांडर या महत्वाच्या पदावर राहून चळवळीशी संबंधित माहिती पोलिसांना देत असल्याच्या संशयातून तेलंगणाच्या हैद्राबाद येथील रहिवासी असलेल्या नेल्सो उर्फ राधा हिची नक्षल्यांनी हत्या केली. २१ ऑगस्ट रोजी नक्षलवाद्यांच्या आंध्र-ओडिशा विशेष विभागीय समितीचा सचिव गणेश याने पत्रक प्रसिद्ध करून राधाच्या हत्येची कबुली दिली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हैद्राबाद येथे ‘डीएमएलटी’चे शिक्षण घेत असताना नक्षलावाद्यांच्या कथित चळवळीला प्रभावित होऊन २०१८ मध्ये बंडखोर स्वभाव असलेली पल्लेपती राधा हिने सदस्य म्हणून नक्षल चळवळीत प्रवेश केला होता. तेव्हापासून ती भूमिगत होती. यासंदर्भात राधाच्या आईने पोलिसात ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. नक्षल चळवळीत ती नेल्सो उर्फ बंटी राधा नावाने ओळखल्या जायची. नक्षलावाद्यांच्या आंध्र-ओडिशा स्पेशल बॉर्डर झोनल समितीत ती संरक्षक दलाची कमांडर म्हणून कार्यरत होती. या काळात ती मोठ्या नक्षल नेत्यांच्या खास मर्जीतील कमांडर म्हणून देखील ओळखल्या जायची.

हेही वाचा – गडचिरोली : जहाल महिला नक्षलवादी पोलिसांना शरण, १६ व्या वर्षी नक्षल चळवळीत…

दरम्याच्या काळात पोलिसांनी तिच्यावर आत्ममर्पण करण्यात दबाव निर्माण केला होता. कुटुंबातील सदस्यांनासुद्धा त्रास देऊ लागले. राधाचा भाऊ सूर्या याला गुप्तचर विभागात नोकरी देण्यात आली. मैत्रिणीच्या माध्यमातून तिला आत्मसमर्पणासाठी आणखी दबाव टाकण्यात आला. त्यामुळे राधाने आत्मसमर्पण न करता चळवळीसंदर्भात माहिती देण्यास होकार दिला. गुप्तचर विभागात कार्यरत भाऊ सूर्याच्या ती संपर्कात होती. यामुळे नक्षल चळवळ कमकुवत होण्यास सुरवात झाली होती. पोलिसांच्या आणखी काही मोठ्या योजनात ती सहभागी होती. याची कुणकुण लागताच तीन महिन्यांपूर्वी तिला कमांडर पदावरून हटविण्यात आले होते. अखेर २१ ऑगस्ट रोजी राधाची हत्या करण्यात आली. असे पत्रकात म्हटले आहे. तेलंगणा- छत्तीसगड सीमेवरील कोत्तागुडम जिल्ह्यातील चेन्नपुरमच्या जंगलात तिचा मृतदेह आढळून आला.

हेही वाचा – विद्यार्थिनी विनयभंग प्रकरण : ‘चाईल्ड हेल्पलाईन’कडे तीन दिवसांपूर्वीच तक्रार, तरीही…

स्त्री-पुरुष संबंधावरील स्पष्टवक्तेपणा भोवला

महाविद्यालयीन जीवनापासूनच राधा बंडखोर स्वभावाची होती. यामुळे ती कोणत्याही विषयावर आपले मत मांडायची. विवाह, स्त्री-पुरुष संबंध यावर अतिशय परखडपणे व्यक्त व्हायची. वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षणामुळे ती अनेक मोठ्या नेत्यांच्या संपर्कात होती. त्यामुळे चळवळीतील इतर सदस्य देखील प्रभावित होत होते. ही बाब वरिष्ठ नक्षल नेत्यांना खटकत होती. त्यामुळे नक्षलवाद्यांनी तिच्यावर शिस्त भंगाचा आरोप देखील पत्रकात केला आहे. तिच्या हत्येमागे हेही एक कारण असल्याचे सांगितले जात आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Woman naxal commander murder by naxalites killed on suspicion of having links with the police ssp 89 ssb