मुख्यमंत्र्यांनी पदवी घेतलेल्या मुक्त विद्यापीठाची ६५४ केंद्रे बंद! ; लाखो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित

दुर्गम भागात उच्च शिक्षण देणारी महाविद्यालये नसल्याने तेथील कनिष्ठ महाविद्यालयांमध्येही मुक्त विद्यापीठाची केंद्रे देण्यात आली होती.

मुख्यमंत्र्यांनी पदवी घेतलेल्या मुक्त विद्यापीठाची ६५४ केंद्रे बंद! ; लाखो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित
(संग्रहित छायाचित्र)

देवेश गोंडाणे, लोकसत्ता

नागपूर : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची कनिष्ठ महाविद्यालयांना संलग्नित असलेली राज्यातील ६५४ केंद्रे बंद करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याच विद्यापीठातून शिक्षण घेत पदवीधर होण्याचे स्वप्न पूर्ण केले आहे. या निर्णयामुळे लाखो विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार आहेत.

दुर्गम भागात उच्च शिक्षण देणारी महाविद्यालये नसल्याने तेथील कनिष्ठ महाविद्यालयांमध्येही मुक्त विद्यापीठाची केंद्रे देण्यात आली होती. मात्र, विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) दोन वर्षांआधीच्या पत्राचा दाखला देत विद्यापीठाने अचानक कनिष्ठ महाविद्यालयांना संलग्नित असलेली केंद्रे बंद करून प्रवेशाला स्थगिती देण्यात आली आहे. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे हे केंद्र वरिष्ठ महाविद्यालयांमध्येच असावे असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने सप्टेंबर २०२० मध्ये सर्व विद्यापीठांना दिले होते. परंतु, करोनाकाळात याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुक्त विद्यापीठाने आता ३२ अभ्यासक्रमांचे कनिष्ठ महाविद्यालयांतील ६५४ केंद्रे बंद करण्याचा निर्णय घेतला. केंद्रावरील विद्यार्थ्यांना वरिष्ठ महाविद्यालयातील केंद्र स्थापन करून त्यांना पुन्हा शिक्षणात कायम ठेवण्यासाठी मेहनत घ्यावी लागणार आहे. केवळ उच्च शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांना केंद्रे जोडलेली असावीत या विद्यापीठ अनुदान आयोगाच्या एका पत्राचा दाखला देत विद्यापीठाने घेतलेल्या या निर्णयाने आज जवळपास अडीच लाख विद्यार्थ्यांवर प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे.

जवळच्या महाविद्यालयात केंद्र

पदवी आणि पदव्युत्तरच्या ३२ अभ्यासक्रमांच्या केंद्राबाबत हा निर्णय घेतला आहे. तूर्तास येथील प्रवेश स्थगित केले आहेत. मात्र, विद्यार्थिहितासाठी ‘यूजीसी’कडून परवानगी मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जवळच्या महाविद्यालयात लवकरच केंद्रे सुरू केली जातील, अशी माहिती विद्यापीठातील एका अधिकाऱ्याने दिली.

पदवी आणि पदव्युत्तरचे अभ्यासक्रम हे वरिष्ठ महाविद्यालयीन प्राध्यापकांकडून शिकवले जाणे आवश्यक आहे. प्राध्यापक असतील त्याच ठिकाणी केंद्र सुरू करणे अत्यावश्यक असतानाही मुक्त विद्यापीठाने कनिष्ठ महाविद्यालयांत पदवी आणि पदव्युत्तरचे अभ्यासक्रम दिले. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये असलेले केंद्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

खासगी शिक्षणाला बळ देण्याचा डाव

सध्या राज्यात मोठय़ा प्रमाणावर खासगी विद्यापीठांचा विस्तार सुरू आहे. या विद्यापीठांना अधिकाधिक विद्यार्थी मिळावे, यासाठी अशा प्रकारची दुरुस्त शिक्षणासाठी असणारी केंद्रे बंद केली जात असल्याचा आरोप शिक्षण क्षेत्रातून होत आहे. मुक्त विद्यापीठाची केंद्रे बंद करून खासगी शिक्षणाला बळ देण्याचा हा डाव असल्याचा आरोपही केला जात आहे.

बंद पडलेली केंद्रे

मुंबई          ७९

पुणे           ८६

अमरावती     १०५

औरंगाबाद      ५१

नाशिक         ७६

कोल्हापूर       ७५

नांदेड         १०९

एकूण         ६५४

मराठीतील सर्व नागपूर / विदर्भ ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Yashwantrao chavan maharashtra open university decided to close 654 centers in maharashtra zws

Next Story
कुणीतरी पोलिसांवर दबाव आणत आहे, भंडारा सामूहिक बलात्कार प्रकरणी आमदार डॉ. मनीषा कायंदे यांचा आरोप
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी