सिन्नर शहर व उपनगरात महिन्यापासून आठ ते दहा दिवसांनी अनियमित व दूषित पाणीपुरवठा केला जात असून याप्रश्नी पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी भाजपच्या वतीने सिन्नर पालिकेवर महिलांचा हंडा मोर्चा काढण्यात आला.
सिन्नरच्या समर्थनगर, कानडी मळा, एसटी कॉलनी, सोनारवाडी या उपनगरांमध्ये अनियमित व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. सध्या सुरू असलेल्या दूषित पाण्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य बिघडत आहे. या दूषित पाण्यामुळे शहरात आजारांच्या साथी पसरण्याची भीती आहे. त्याचे गांभिर्य लक्षात घेता व सिन्नर शहरातील अनियमित पाणीपुरवठय़ाबाबत अती तातडीने पाणीपुरवठा समितीचे सर्व सदस्य व कर्मचारी यांच्या बैठकीचे आयोजन करावे व लवकरात लवकर योग्य निर्णय घ्यावा.
शहरातील जलवाहिनीत फेरबदल करताना कशाचा आधार घेतला त्याची माहिती मिळावी, शासकीय आयटीआय भागात पाणीपुरवठा होत नसताना सक्तीची पाणीपट्टी थांबवावी, रात्री १०-१५ मिनिटे पाणी सोडणे बंद करावे, एकतानगर भागात पाणी पुरवठा होत नसल्याने त्यासंदर्भात निर्णय घ्यावा, सिन्नर शहरात प्रत्येक भागात पाणी सोडण्याची वेळ निश्चित करावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत. पाणीपुरवठय़ाबाबत योग्य व ठोस निर्णय घेऊन सदर भागात तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची गरज मांडण्यात आली आहे.
या संदर्भात पालिका प्रशासनास भाजपचे शहराध्यक्ष पंकज जाधव, पालिकेतील गटनेते नामदेव लोंढे, सिमंतिनी कोकाटे यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले. दुषित पाणीपुरवठा करून शहरातील नागरिकांच्या आरोग्याशी प्रशासन आणि सत्ताधारी खेळ खेळत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.
या मागण्यांविषयी त्वरित निर्णय न घेतल्यास मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करून दालनास टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
लवकरच संबंधित भागास पाणीपुरवठा केला जाईल, असे आश्वासन मुख्याधिकाऱ्यांनी दिले आहे. निवेदनावर भाजपचे शहराध्यक्ष पंकज जाधव, पालिकेतील गटनेते नामदेव लोंढे यांची स्वाक्षरी आहे. यावेळी विठ्ठल उगले हेही उपस्थित होते.