निफाड तालुक्यातील तीन नद्यांच्या संगमावर असलेल्या नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात हिवाळ्याची चाहूल लागताच एका नवीन पाहुण्याचे आगमन झाले आहे. या वर्षी या अभयारण्यात अनेक नवीन पक्षी दिसण्याचे संकेत यानिमित्ताने मिळाले आहेत. या अभयारण्यात वन विभागाच्या पक्षी गणनेत काळटोप खंडय़ा (ब्लॅक कॅप्ड किंगफिशर) बघावयास मिळाला. यामुळे पक्षीप्रेमी अभयारण्यात गर्दी करू लागले आहेत.
नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात कॉमन खंडय़ा, पांढऱ्या गळ्याचा खंडय़ा आणि कवडय़ा धीवर (बंडय़ा) हे किंगफिशर आढळत असल्याची नोंद आहे. पण आता काळटोप खंडय़ा च्या दर्शनाने पक्षीमित्रांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. हा पक्षी प्रामुख्याने सागरी प्रदेश आणि खारफुटीच्या जंगलात आढळतो. नाशिककरांना हा पक्षी पाहण्यासाठी कोकणात जावे लागत होते. पण आता तो नाशिककरांच्या जवळ आला आहे. हा पक्षी वर्ग चारमध्ये समाविष्ट होतो. ‘की की की की’ असा आवाज करीत तो लक्ष वेधून घेतो. ड्रेगन फ्लाय, मासे हे त्याचे प्रमुख खाद्य आहे. हा पक्षी २८ सेंमी लांब असून त्याच्या पंखावरील जांभळा-निळा रंग, पांढरी मान, लाल चोच त्याचे सौंदर्य वाढविते. मासे पकडण्यासाठी पाण्यात त्याने मारलेला सूर थक्क करणारा असतो. इतर अनेक किंगफिशरप्रमाणे या पक्ष्याच्या निळ्या पंखांचा वापर गिरणी उद्योगात केला जातो. तसेच हाँगकाँगमध्ये त्यांच्या पंखांचा वापर दागिन्यांसाठी केला जात असल्याने या पक्ष्यांची संख्या कमी होत आहे. हे पक्षी जमिनीत बोगदे करून घरटे बनवितात. या वर्षी महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात पाऊस झाला. दिवाळीनंतरही पावसाचा मुक्काम राहिला. याचा परिणाम पक्ष्यांच्या निसर्ग साखळीवर होण्याची शक्यता आहे.
काळटोप खंडय़ाचे पहिल्यांदाच दर्शन
काळटोप खंडय़ा हा पक्षी वन विभागाच्या पक्षी गणना करतांना एका निरीक्षण मनोऱ्यावर दिसला. या पक्ष्यावर त्याच जातीतील इतर पक्षी आRमण करीत होते. त्याला या भागातून निघून जा, असेच जणूकाही सांगत असावेत. हा पक्षी या वर्षी पडलेल्या मोठय़ा पावसामुळे विचलित होऊन आला असावा. – प्रा. आनंद बोरा (पक्षी निरीक्षक)