तळेगाव येथे पाच वर्षांच्या बालिकेवर रविवारी बलात्काराचा प्रयत्न झाल्याच्या घटनेनंतर नाशिकमधील वातावरण अजून तप्त आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून जिल्ह्यातील इंटरनेट सेवा तात्पुरत्या कालावधीसाठी खंडित करण्यात आली आहे. या प्रकरणी समाजमाध्यमांतून निरनिराळ्या अफवा पसरविल्या जात आहेत. त्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले आहे. मात्र, या सेवा खंडित केल्याचे प्रशासनाकडून अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. याशिवाय, नाशिकमधील बस सेवाही काहीवेळापूर्वीच थांबविण्यात आल्याचे वृत्त आहे. सध्या नाशिक शहर आणि अंतर्गत परिसरातील बससेवा पूर्णपणे थांबविण्यात आली आहे. मात्र, नाशिक महामार्ग आणि रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत आहे.
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री दिपक केसरकर यांनी सोमवारी सकाळी पीडित बालिकेची भेट घेतली. याप्रकरणी आरोपींवर १५ दिवसांत आरोपपत्र दाखल केले जाईल, असे आश्वासनाही त्यांनी यावेळी दिले. दीपक केसरकर काहीवेळातच सर्वपक्षीय स्थानिक नेते आणि पोलिस महासंचालकांसोबत संयुक्त बैठक घेणार आहेत.
या घटनेनंतर काल नाशिकमधील वातावरण प्रचंड तापले होते. जिल्ह्यात अनेक ठिकाणी या घटनेचे पडसाद उमटले होते. संतप्त जमावाने नाशिक-त्र्यंबकेश्वरसह मुंबई-आग्रा महामार्गावर अनेक ठिकाणी रास्ता रोको, एसटी बसवर दगडफेक केल्याने रस्ते वाहतूक ठप्प झाली होती. मात्र, आज येथील वातावरण निवळले असून परिस्थिती पूर्वपदावर येण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, सुरक्षेच्या कारणास्तव आजही नाशिकमधील बहुतेक शाळांना आज सुट्टी देण्यात आली आहे.
त्र्यंबकेश्वरजवळील तळेगाव येथे शनिवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास १५ वर्षांच्या मुलाने घराशेजारीच राहणाऱ्या पाच वर्षांच्या बालिकेस परिसरात नेऊन अत्याचाराचा प्रयत्न केला. बालिकेची परिस्थिती पाहून पालकांनी तिला त्र्यंबकेश्वर येथील रुग्णालयात दाखल करून पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी त्वरित कार्यवाही करत संशयितास ताब्यात घेऊन तो अल्पवयीन असल्याने पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस ठाण्यासमोर मोठय़ा प्रमाणावर जमाव जमला. जमावाने त्र्यंबकेश्वर रस्त्यावर ठाण मांडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान, पीडित बालिकेस रात्री जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. बालिकेवरील अत्याचाराची माहिती जिल्ह्य़ात इतरत्र पसरताच मध्यरात्रीपासूनच मुंबई-आग्रा महामार्ग तसेच त्र्यंबकेश्वर मार्गावर ठिकठिकाणी जमाव रस्त्यावर उतरण्यास सुरुवात झाली. रविवारी सकाळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी भेट दिली. जमावाशी चर्चा करीत असतानाही घोषणाबाजी सुरूच होती. त्यामुळे महाजन यांना शांततेचे आवाहन करीत नाशिकला परतावे लागले.