नंदुरबार – शाळेला सुट्या लागल्याने आई आणि तीन वर्षाच्या बहिणीबरोबर मामाच्या गावाला जाण्यासाठी निघालेल्या आठ वर्षाच्या बालकाचा बसने दाबल्याने मृत्यू झाला. स्थानकात बस मागे घेत असताना खांब आणि बस यांच्यात हा बालक दाबला गेला. शहादा तालुक्यातील मंदाणे गाव येथील हा बालक आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मंगळवारी दुपारी दोन वाजता शहादा येथील मध्यवर्ती बस स्थानकात फलाट क्रमांक एक येथे शहादा तालुक्यातील मंदाणे येथील रुद्र हरिश्चंद्र मोरे (आठ वर्ष) हा आई आणि तीन वर्षाच्या बहिणीबरोबर बसची प्रतीक्षा करीत होता. सुट्या लागल्याने मंदाणे येथून आलेले हे तिघे जण मामाचे गाव असलेल्या साक्री येथे जाण्यासाठी निघाले होते. यावेळी चालक हेमंत पाटील हे नंदुरबारकडे जाणारी बस फलाटावर मागे घेत असताना फलाटाच्या खांब्याजवळ उभा असलेला रुद्र मोरे खांब आणि बस यांच्यात दाबला गेला.

जोरात आवाज झाल्याने  स्थानकातील प्रवासी, कर्मचारी घटनास्थळी धावत गेले. दाबल्या गेलेल्या रुद्रला बाहेर काढले. रुद्र यास खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्याला मयत घोषित करण्यात आले. यासंदर्भात शहादा पोलीस ठाण्यात हरिश्चंद्र मोरे (रा. मंदाणे ता. शहादा,जि. नंदुरबार) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन बस चालक हेमंत पाटील, वाहक महेंद्र पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बालकाचे शवविच्छेदन झाले असले तरी या घटनेनंतर महामंडळाचा कोणताच अधिकारी पालकांचे सांत्वन अथवा चौकशी करण्यासाठी आला नसल्याने मंदाणे ग्रामस्थांनी निषेधार्थ मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतल्याने गोंधळ उडाला आहे. मंगळवारी सायंकाळी उशिरापर्यंत हा गोंधळ सुरु होता.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Child dies after being crushed between bus and pole in nandurbar district zws