अंदाजपत्रकात ३० कोटींची तरतूद

शहरात सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करण्यासाठी महापालिकेच्या वतीने शहर बस सेवा याच वर्षी सुरू करण्यावर स्थायी समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. अंदाजपत्रकात शहर बससेवेसाठी ३० कोटींची तरतूद करण्यात आली. शहर बस सेवा चालविण्याच्या मुद्यावरून अनेक वर्षांपासून एसटी महामंडळ आणि महापालिकेत चाललेला वाद संपुष्टात आला आहे. शहर बससेवेसाठी प्रारंभी २०० गाडय़ा उपलब्ध करण्यात येणार आहेत. त्यात अरुंद मार्गाचा विचार करून काही मध्यम आकाराच्या गाडय़ांचाही अंतर्भाव राहणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अद्ययावत बससेवा देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.

शहर बससेवेत नुकसान होत असल्याने ही सेवा महापालिकेने चालवावी, अशी मागणी महामंडळाकडून करण्यात येत होती. काही महिन्यांपूर्वी महामंडळाने अनेक मार्गावरील बस फेऱ्या कमी केल्यामुळे विद्यार्थ्यांसह नाशिककरांचे हाल होऊन रिक्षाचालकांची मनमानी वाढली. प्रवासी अधिक आणि बस कमी अशी तफावत झाल्यामुळे आहे त्या बसमधून अक्षरश: जीव धोक्यात घालत प्रवास करण्याची वेळ नाशिककरांवर आली आहे. मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखविल्यानंतर सत्ताधारी भाजपकडून बससेवा चालविण्याच्या दिशेने धडपड सुरू झाली होती. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अंदाजपत्रकात त्यासाठी खास निधीची तजवीज करत सार्वजनिक वाहतुकीचा बिकट झालेला प्रश्न सोडविण्याचा मनोदय व्यक्त केला. शहराची लोकसंख्या मोठय़ा प्रमाणात वाढत असताना महामंडळाच्या गाडय़ांची संख्या अतिशय कमी आहे. बस मार्गात सुसूत्रता नाही. यामुळे नागरिक दैनंदिन प्रवासासाठी खासगी वाहनांचा अधिक्याने वापर करतात. परिणामी, रस्त्यांवर खासगी दुचाकी, चारचाकी वाहनांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढून रहदारीला अडथळे होत आहेत. ही बाब प्रदूषण वाढण्यास कारक ठरली. या पाश्र्वभूमीवर, क्रिसील संस्थेचा अहवाल सादर केल्यानंतर याच वर्षांत बससेवा सुरू करण्याचा मनोदय असल्याचे मुंढे यांनी सांगितले. नागरिकांनी सार्वजनिक वाहतुकीचा अधिक्याने वापर करावा यावर भर दिला जाणार आहे. सर्वसामान्यांना सुरक्षित, सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून दिली जाईल. शहर बस सेवेसाठी पायाभूत सुविधांची उभारणी अन्य बाबींसाठी अंदाजपत्रकात ३० कोटींची तरतूद करण्यात आली असून गरजेनुसार त्यात वाढ केली जाणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले. स्थायी सभापती हिमगौरी आडके यांनी शहर बससेवा सुरू करण्यास मान्यता देऊन हा प्रस्ताव तातडीने सर्वसाधारण सभेत ठेवण्याचे सूचित केले.

आधुनिक तंत्राने अद्ययावत सेवेचा प्रयत्न

शहर बससेवेसाठी प्रारंभी २०० गाडय़ा उपलब्ध कराव्या लागतील. त्यामध्ये अरुंद मार्गासाठी मध्यम आकाराच्या गाडय़ा घ्याव्या लागणार आहेत. बससेवा सुरू करण्यासाठी आगार, थांबे, बस ठेवण्यासाठीची व्यवस्था आदी पायाभूत सुविधा उभाराव्या लागणार आहेत. बससेवेसाठी माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात येणार आहे. बससेवेचे वेळापत्रक, मार्ग, येण्या-जाण्याच्या वेळा आदींबाबत सर्व माहिती भ्रमणध्वनी अ‍ॅपवर उपलब्ध राहील. तसेच बस येण्याच्या वेळेबाबत पूर्वसूचना, तक्रार निवारण सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न राहणार आहे.