नाशिक : इयत्ता १०वी परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार हे निश्चित नसले तरी शिक्षण मंडळाच्या वतीने नवीन शैक्षणिक वर्षांसाठी ११वी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. या संदर्भात वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून १०वीचा निकाल जाहीर होईपर्यंत पहिल्या टप्प्यातील काम सुरू राहणार आहे.
नवीन शैक्षणिक वर्षांचा श्रीगणेशा यंदा करोना संकटामुळे ऑनलाइन झाला असून विद्यार्थ्यांचे नुकसान नको म्हणून १०वीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकवणे सुरू झाले आहे. जुलै, ऑगस्टमध्ये करोनाची परिस्थिती कशी राहील, यावर प्रत्यक्ष शाळेत वर्ग भरविण्यात यावेत की नाही त्याचा निर्णय घेतला जाईल. ११वी प्रवेशाचे काय, हा पालकांना पडणारा प्रश्न सोडविण्याचे कामही शिक्षण मंडळाने केले आहे.
१ ते १५ जुलै या कालावधीत महापालिका तसेच जिल्हा परिसरातील उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांच्या संकेतस्थळावर ऑनलाइन नोंदणी सुरू राहणार आहे.
२ ते १६ जुलै या कालावधीत उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी नोंदवलेली माहिती तपासून ऑनलाइन अंतिम करण्याचे काम करण्यात येणार आहे.
१५ जुलैपासून १०वी परीक्षेचा निकाल जाहीर होईपर्यंत विद्यार्थ्यांनी पालकांच्या मदतीने ऑनलाइन नोंदणी करणे, प्रवेश अर्जातील पहिला भाग भरणे, माहिती अचूक आहे की नाही याची खातरजमा करणे ही कामे होतील.
विद्यार्थी प्रवेश अर्जातील माहिती भाग एक ऑनलाइन तपासून खात्री करण्यासाठी शाळा स्तरावरून संपर्क करण्यात येईल.
१६ जुलैपासून निकाल जाहीर झाल्यानंतर ऑनलाइन अर्जाचा दुसरा भाग भरून प्रत्यक्ष प्रवेश प्रक्रियेस सुरुवात होईल, अशी माहिती शिक्षण उपसंचालक पु. म. पाटील यांनी दिली.