जळगाव : जिल्ह्यात एक जून ते १६ सप्टेंबरच्या कालावधीत अतिवृष्टीसह पुरामुळे ७९९ गावांमधील सुमारे १७ हजार १२५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. तर ३२ हजार ९७५ शेतकरी बाधित झाले. दरम्यान, जिल्हा प्रशासनाने फक्त जूनच्या नुकसानीचा अहवाल विभागीय आयुक्तांकडे पाठविल्याने संबंधित शेतकऱ्यांना नुकसानीचे कोणतेच अनुदान मिळू शकलेले नाही.

जिल्ह्यात केवळ खरीप हंगामातच नाही तर उन्हाळ्याच्या दिवसातही चक्रीवादळासह अवकाळी पावसाने तडाखा दिला होता. ज्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यांत ८०९ गावांमधील केळी, मका, पपई आणि इतर फळपिकांचे ११ हजार ५९३ हेक्टरचे नुकसान होऊन २४ हजार ७३३ शेतकरी बाधित झाले होते. जून महिन्यातही पावसाळा सुरू झाला, तरी चक्रीवादळासह पावसाने तडाखा देणे सुरूच ठेवले. त्यामुळे सुमारे ४७७२ हेक्टरवरील केळीसह इतर फळपिकांचे अतोनात नुकसान झाले होते. अपवाद फक्त जुलै महिना ठरला. ऑगस्टमध्ये पुन्हा अतिवृष्टीसह वादळी वाऱ्यामुळे सुमारे ८०२८ हेक्टरवरील कपाशी, मका, ज्वारी, कांदा पिकाचे नुकसान झाले. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी अतिवृष्टीसह पुरामुळे आणि जमीन खरडल्याने पुन्हा ४३२७ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने सादर केला आहे.

जिल्ह्यात एक जून ते १६ सप्टेंबरच्या कालावधीत १७ हजार हेक्टर १२५ हेक्टर क्षेत्रावरील विविध पिकांचे नुकसान झाल्याने संबंधित शेतकरी हवालदिल होऊन बसले आहेत. प्रत्यक्षात, अनुदान मागणीसाठी शासनाकडे आतापर्यंत फक्त जूनचा अहवाल पाठविल्याचे उघडकीस आले आहे. ऑगस्टमधील नुकसानीचा अहवाल पाठविण्यासंदर्भात यंत्रणेकडून चालढकल झाल्याचे आढळले आहे. जिल्ह्यातील जून आणि ऑगस्ट या दोन महिन्यातील पीक नुकसानीचा आकडा १२ हजार ७९८ हेक्टरपर्यंत होता. त्यात आता पुन्हा सप्टेंबरमधील ५४८५ हेक्टरवरील पीक नुकसानीची भर पडली आहे.

एप्रिल-मे मध्ये २४ कोटींवर मदत

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून प्राप्त माहितीनुसार, एप्रिल आणि मे महिन्यात अवकाळी पावसासह गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे सुमारे ११ हजार ५९३ हेक्टरचे नुकसान झाले होते. प्रत्यक्षात, शासनाकडून एप्रिल महिन्यातील नुकसानीच्या मदतीसाठी चार कोटी ५३ लाख १७ हजार रूपये आणि मे महिन्यातील नुकसानीच्या मदतीसाठी १९ कोटी ९६ लाख १६ हजार रूपये अनुदान मजूर झाले होते.

जळगाव जिल्ह्यातील नुकसान

(एक जून ते १६ सप्टेंबर)

● बाधित गावे- ७००

● बाधित शेतकरी- ३२ हजार ९७५

● बाधित क्षेत्र- १७ हजार १२५ हेक्टर

कृषी विभागाकडून पीक नुकसानीचे पंचनामे करून त्या संदर्भात अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठविला जातो. नुकसानग्रस्तांच्या अनुदानासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शासनाकडे पाठपुरावा करण्यात येतो.  – कुर्बान तडवी (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव)