मालेगाव : दिवाळी सणाच्या निमित्ताने शहरात सुरू झालेल्या सहा दिवसीय विशेष स्वच्छता अभियानाची रविवारी सांगता झाली. यावेळी अभियानात सहभागी झालेल्या महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यातर्फे भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. शहर स्वच्छ व सुंदर होण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांनी सजग राहावे, असे आवाहन भुसे यांनी यावेळी बोलताना केले.
भुसे यांच्या संकल्पनेतून गेल्या ७ ते १२ ऑक्टोबर या काळात शहरात विशेष स्वच्छता अभियान राबविण्यात आले. महापालिका आयुक्त रवींद्र जाधव, उपायुक्त गणेश शिंदे, सहाय्यक आयुक्त अनिल पारखे यांच्या हस्ते संगमेश्वर भागात अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर दररोज शहरातील विविध भागात हे अभियान राबविण्यात आले. अभियानात महापालिकेच्या ३०० कर्मचाऱ्यांसह सामाजिक संघटनांचे व शिंदे गटाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. पाचपैकी शेवटच्या दोन दिवशी स्वतः भुसे यांनी कचरा संकलन करत अभियानात सहभाग नोंदवला.
अभियानाची सांगता करत असताना रविवारी भुसे यांच्या संपर्क कार्यालयात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी महापालिका आयुक्त रवींद्र जाधव, माजी उपमहापौर सखाराम घोडके, नीलेश आहेर, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख संजय दुसाने, रामा मिस्तरी,अजिंक्य भुसे, नीलेश काकडे, विनोद वाघ आदी उपस्थित होते. २०१४ पासून देशात सुरू झालेल्या ‘स्वच्छ भारत’ अभियानामुळे देशात स्वच्छतेची चळवळ उभी राहिली आहे. त्याच धर्तीवर राज्यात ‘स्वच्छता ही सेवा’ ही मोहीम सामाजिक चळवळ म्हणून राबवली जात असल्याचे भुसे यांनी यावेळी नमूद केले. ‘आपले शहर आपली जबाबदारी’ हा मंत्र लक्षात घेऊन प्रत्येक नागरिकाने शहर स्वच्छतेसाठी काळजी घ्यावी,असे आवाहनही भुसे यांनी यावेळी केले.
अभियानात सहभागी झालेल्या स्वच्छता कर्मचारी,महापालिका अधिकारी व अन्य कार्यकर्त्यांचे भुसे यांनी आभार मानले. तसेच महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांना साडी व मिठाई तसेच पुरुष कर्मचाऱ्यांना मिठाई देऊन भुसे यांच्याकडून यावेळी गौरविण्यात आले. येत्या काळात स्वच्छतेकडे अधिक लक्ष देण्यात येईल व शहर स्वच्छ व सुंदर करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही आयुक्त जाधव यांनी याप्रसंगी बोलताना दिली.