शालेय स्तरावर पर्यावरण विभागाच्या सहकार्याने सुरू असलेल्या पर्यावरण सेवा योजनेंतर्गत नाशिक, जळगाव व अहमदनगर या तीन जिल्ह्य़ांतील १० तालुक्यांमध्ये १६ गावांचा पर्यावरणीय सद्यस्थितीवर अहवाल तयार करण्यात आला आहे. पुढील शैक्षणिक वर्षांपासून स्थानिक समस्यांवर लोकसहभाग व नियोजनानुसार उपाययोजना करण्यावर भर देण्यात येईल. यासाठी ई-कचरा पेटी, प्लास्टिकचा पुनर्वापर आदी प्रश्न समोर ठेवून काम करण्यात येणार आहे.
मागील शैक्षणिक वर्षांत पर्यावरण सेवा योजनेत सातवी ते नववी इयत्तेतील विद्यार्थ्यांनी शाळेत व गावात गणपती, दुर्गा देवी उत्सव दरम्यान निर्माल्य संकलन व त्यापासून कंपोस्ट खत, शाडू मातीचा गणपती तयार करणे, पर्यावरणपूरक गणपती मंडळ, आसखेडा गावात कुजणाऱ्या कचऱ्यापासून गांडुळखत प्रकल्प, औषधी वनस्पती उद्यान, नैसर्गिक रंग बनविणे आदी उपक्रम राबविले. तसेच पक्ष्यांसाठी कृत्रिम घरटे, खाद्य पेटी आणि पाण्याचे भांडे आदी उपक्रमांत सक्रिय सहभाग घेतला. सर्वेक्षण व अहवाल निर्मिती प्रक्रियेंतर्गत सहभागी विद्यार्थी, ग्रामस्थ व शिक्षकांच्या माध्यमातून आपल्या परिसरातील स्थानिक पर्यावरणीय प्रश्न समजून गाव व परिसराचा सध्यस्थिती अहवाल तयार करण्यात आला. त्यात कर्मवीर भाऊराव पाटील (बागलाण), जनता विद्यालय (दिंडोरी), सरस्वती माध्यमिक विद्यालय (मालेगाव), जनता विद्यालय (बागलाण), जय श्री दादाजी हायस्कूल व नूतन ज्ञान मंदिर (चोपडा, जळगाव), ब. गो. शानबाग विद्यालय (जळगाव), नेहरू विद्या मंदिर (भुसावळ), घनश्याम काशिनाथ विद्यालय (यावल), जनता विद्यालय (नांदगाव), व्ही. पी. एन हायस्कूल (सटाणा), के. बी. एच. विद्यालय (देवळा), माध्यमिक विद्यालय (पळसे), संत ज्ञानेश्वर विद्यालय (मालेगाव), गोमुखेश्वर मा. वि. (बागलाण), आदींनी अहवाल तयार केला.
या सर्वेक्षणाद्वारे पाणी, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, ऊर्जा, जैवविविधता या विषयांवर आधारित समस्या शोधत ग्रामस्थांच्या सहभागाने सादरीकरण-लोकसहभागातून अहवाल तयार झाला. हा अहवाल ग्रामसभेत मांडण्यात आला. तसेच, पुढील शैक्षणिक वर्षांपासून प्राधान्याने निश्चित केलेल्या समस्यांवर लोकसहभागातून उपाययोजना केल्या जाणार असल्याचे विभाग समन्वयक जगदीश ठाकूर यांनी सांगितले. त्यामध्ये गावातील कचरा वर्गीकरण, कुजणारा -न कुजणारा कचरा, कुजणाऱ्या कचऱ्यापासून खत तयार करणे, प्लास्टिकचा पुनर्वापरासाठी पाठवणे, कापडी पिशव्या तयार करणे, ई-कचरा पेटी ठेवणे व त्याचे शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी अधिकृत संस्थेस काम देणे, पावसाचे पाणी मोजणे, त्याची गुणवत्ता तपासणे, पाण्याची खोली मोजणे, बंधारे बांधणे, सांडपाणी जिरवण्यासाठी शोषखड्डे, रूफ रेन वाटर हार्वेस्टिंग, ऊर्जा या गावातील जैवविविधता नोंद वही आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 4th May 2016 रोजी प्रकाशित
पर्यावरणीय अहवालाद्वारे १६ गावांमध्ये स्थानिक समस्या सोडविण्याकडे लक्ष
ई-कचरा पेटी, प्लास्टिकचा पुनर्वापर आदी प्रश्न समोर ठेवून काम करण्यात येणार आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 04-05-2016 at 03:03 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Environmental report local issues