महावितरणच्या नावाने ग्राहकांना बनावट लघुसंदेश ; सावधगिरी बाळगण्याचे आवाहन

महावितरणकडून केवळ भ्रमणध्वनी क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीज ग्राहकांनाच आपल्या व्यवस्थेतून लघुसंदेश (एसएमएस) पाठविण्यात येतात.

नाशिक : मागील महिन्याचे वीज देयक अद्ययावत नसल्याच्या कारणावरून आज रात्री ९.३० वाजता वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे. करिता ताबडतोब सोबत दिलेल्या वैयक्तिक भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे बनावट लघूसंदेश ( एसएमएस) वैयक्तिक भ्रमणध्वनी क्रमांकावरून नागरिकांना पाठविले जात आहेत. अशा प्रकारचे कोणतेही लघूसंदेश आणि व्हॉट्सअ‍ॅप संदेश महावितरणकडून पाठविले जात नाही. त्यामुळे या लघूसंदेशला प्रतिसाद वा उत्तर देऊ नये असे आवाहन खुद्द महावितरणने केले आहे.

वेगवेगळय़ा वैयक्तिक भ्रमणध्वनी क्रमांकावरून पाठविण्यात येणाऱ्या परंतु महावितरणशी संबंधित लघुसंदेश अर्थात एसएमएसला अथवा भ्रमणध्वनीला नागरिकांनी प्रतिसाद देऊ नये. देयक भरण्यासाठी वैयक्तिक भ्रमणध्वनी क्रमांकावरून एखादी लिंक पाठविण्यात आली असेल तर दुर्लक्ष करावे. अन्यथा यामधून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता आहे, याकडे महावितरणने लक्ष वेधले आहे. महावितरणकडून केवळ भ्रमणध्वनी क्रमांकाची नोंदणी केलेल्या वीज ग्राहकांनाच आपल्या व्यवस्थेतून लघुसंदेश (एसएमएस) पाठविण्यात येतात.

ग्राहकास आलेला अनावश्यक लघुसंदेशचा नमुना

त्याचा सेंडर आयडी हा एमएसईडीसीएल (उदा. व्हीएम-एमएसईडीसीएल, व्हीके-एमएसईडीसीएल) असा आहे. तसेच या अधिकृत संदेशातून कोणालाही, कोणत्याही अधिकाऱ्याच्या वैयक्तिक भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधण्याचे कळविले जात नाही.

महावितरणकडून संदेशाद्वारे केवळ पूर्वनियोजित देखभाल आणि दुरुस्ती, तांत्रिक किंवा अन्य कारणांमुळे वीज पुरवठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणारा संभाव्य कालावधी तसेच दरमहा वीज देयकांची रक्कम, स्वत:हून मीटर नोंद पाठविण्याचे ग्राहकांना आवाहन, मीटर नोंद घेतल्याची तारीख व वापर केलेली एकूण युनिट संख्या, वीज देयकाची रक्कम, देय दिनांक, वीज पुरवठा खंडित करण्याची नोटीस आदींची माहिती पाठविली जाते. वैयक्तिक भ्रमणध्वनी क्रमांकावरून नागरिकांना पाठविण्यात येणारे संदेश बनावट असून त्यातून फसगत होऊ शकते असे महावितरणने स्पष्ट केले आहे. त्यामुळे असे लघुसंदेश, फोन तसेच पेमेंट लिंकला नागरिकांनी प्रतिसाद देऊ नये. काही शंका आणि तक्रारी असल्यास वीज ग्राहकांनी २४ तास सुरु असलेल्या १९१२, १८००१०२३४३५ किंवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांक किंवा नजीकच्या महावितरण कार्यालयांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व नाशिक ( Nashik ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Fake sms to customers in the name of msedcl zws

Next Story
गोठय़ातील पाच गाईंची हत्या ; इगतपुरी तालुक्यातील घटना
फोटो गॅलरी