‘मुक्त’च्या कृषी केंद्रामार्फत हजारो शेतकऱ्यांचे वेगवेगळे प्रयोग

जूनच्या दुसऱ्या आठवडय़ात पावसाने दिलेल्या सलामीने शेतीची कामे वेग घेण्याच्या मार्गावर असतानाच काही शेतकऱ्यांनी मात्र पारंपरिक पद्धतीची शेती नाकारत नवीन पायवाट शोधण्यास सुरुवात केली. येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून वर्षांकाठी तीन हजारहून अधिक शेतकरी शेतीत वेगवेगळे प्रयोग करीत त्यादृष्टीने बदल करत आहेत. दुसरीकडे, जोडधंदा म्हणून अनेकांनी रोपवाटिकेचा पर्याय निवडला असून जिल्ह्य़ात ठिकठिकाणी भाजीपाला तसेच अन्य रोपे पुरविणाऱ्यात प्रगतशील शेतकरी अग्रेसर आहेत.

जूनच्या प्रारंभी शेतकरी संप सुरू झाला असताना जिल्ह्य़ातील काही भागांत पावसाने हजेरी लावली. दरम्यानच्या काळात शेतकऱ्यांची आंदोलनेही झाली. अखेरीस कर्जमाफी व तत्सम प्रश्नांवर शासनदरबारी चर्चा झाल्यानंतर शेतकरी वर्गाचा जीव भांडय़ात पडला. कारण, पेरणीसह अन्य कामे त्यांना खुणावत आहेत. शेतकरी वर्गाच्या मानसिकतेत बदल होत आहे. काहींनी पारंपरिक पद्धतीची झूल उतरवत नव्या पायवाटेने जाण्याचे निश्चित केले. मुक्त विद्यापीठातील कृषी विज्ञान केंद्र त्यांचे मुख्य आधारस्तंभ ठरले. गेल्या काही वर्षांपासून हे केंद्र शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शकाची भूमिका निभावत आहे. या केंद्रात जिल्ह्य़ाची भौगोलिक परिस्थिती, हवामानातील विविधता, शेतीनुरूप हवामानाचा फायदा घेत नेमके कोणते पीक घ्यावे, याचा विविध अंगांनी अभ्यास करत शेतकऱ्यांना उद्भवणाऱ्या अडचणीवर संशोधन करण्यात येत आहे. या अडचणींना उत्तर शोधून शेती फायदेशीर करण्यासाठी प्रत्येक हंगामासाठी ‘एकात्मिक शेती’चा पर्याय देण्यात आला आहे.

शेती म्हटले की, पावसाळ्यावर अवलंबून या समीकरणाला छेद देत प्रत्येक हंगामात पीक घेऊन कुटुंबाला रोजगार कसा उपलब्ध होईल, तसेच स्थानिकांना रोजगारनिर्मितीसाठी प्रयत्न होत आहे. यासाठी फलोत्पादनावर आधारित पिकांचा अभ्यास होत आहे. एकात्मिक शेतीत त्या पिकासोबत आंतरपीक कोणते घेता येईल. जेणेकरून एखाद्या पिकाला कमी भाव मिळाला तरी आर्थिक नुकसान फार होणार नाही. याशिवाय शेतीपूरक जोडव्यवसाय कसे करता येईल, याची माहिती दिली जाते. शेतीत रासायनिक खतांपेक्षा सेंद्रिय पद्धतीचा अवलंब करत जमिनीचा पोत कसा सुधारेल यासाठी प्रयत्न होत आहे. कौशल्य आधारित प्रशिक्षण व त्यातून रोजगारनिर्मिती हे उद्दिष्ट ठेवत केंद्राची वाटचाल सुरू असल्याने वर्षांकाठी तीन हजार शेतकरी या उपक्रमाचा लाभ घेत आहेत. त्यात महिला व युवा शेतकऱ्यांचे प्रमाण लक्षणीय असून अनेकांकडून रोपवाटिकाचा व्यवसायाला पसंती देण्यात येत आहे. नाशिकमध्ये रोपवाटिका व भाजीपाला रोपे यामध्ये दत्तू ढगे, भाऊसाहेब जाधव, शांताराम पवार यांच्यासह अन्य प्रयोगशील शेतकऱ्यांनी रोपवाटिका सुरू केली असून त्यांच्या व्यवसायाने अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा

शेतकऱ्यांना वर्षभर काम मिळावे, जमिनीचा पोत आणि पिकाची गुणवत्ता वाढावी, यासाठी वेगवेगळे प्रयोग व प्रात्यक्षिक केंद्रात करण्यात येत आहे. याच वेळी कौशल्यावर आधारित रोजगार उपक्रम सुरू आहे. शेतकरी आपल्या शेतात आंतरपीक शेतीसह औषधी वनस्पतींची लागवड करत आपल्या उत्पादनात वाढ कशी होईल यासाठी प्रयत्नशील आहेत.

– रावसाहेब पाटील , प्रमुख कृषी विज्ञान केंद्र