दुष्काळाच्या सावटामुळे शहरात कपात लागू झाली असताना पाणी बचतीचे महत्त्व सर्वांपर्यंत पोहोचावे, या उद्देशाने मुंबई येथील फ्ल्यूट फाऊंडेशन संस्था आणि नाशिक महापालिका या संस्थेतर्फे दीपावलीनिमित्त १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता हरिप्रसाद चौरसिया, पं. राकेश चौरसिया आणि सत्यजित तळवळकर यांच्या बासरी वादनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
दादासाहेब गायकवाड सभागृहात ही मैफल रंगणार आहे. त्यास महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, हरित कुंभ नाशिक, क्रेडाई व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ, आर्किटेक्ट असोसिएशन यांचे सहकार्य लाभले आहे. या निमित्ताने नाशिककरांना प्रसिद्ध बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया व इतरांकडून सुरेश बासरी वादनाची मेजवानी मिळणार आहे. या कलाकारांनी ‘पाणी वाचवा’ या मोहिमेत सहकार्य देण्याची भूमिका स्वीकारली आहे. फाऊंडेशनचा मूळ उद्देश ‘पाणी वाचवा, जीवन जगवा’ असा असून सद्य:स्थितीत राज्यात सर्वत्र त्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. नाशिकमध्येही दैनंदिन पाणीपुरवठय़ात २५ टक्के कपात करण्यात आली आहे. या स्थितीत पाण्याचा काटकसरीने वापर करणे अनिवार्य ठरले आहे. या संदर्भात उपयुक्त माहिती जनतेला मिळावी, यादृष्टीने कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. या माध्यमातून जनजागृती सोबत पाणी वाचविण्यासाठी उपयुक्त योजना राबविण्यासाठी सर्व सहकारी संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. यासाठी कलावंतही आपला मौल्यवान वाटा उचलणार असल्याचे संस्थेच्या रेणू सोमण यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रवेशिका महाकवी कालिदास कलामंदिर तसेच हॉटेल मनोरथ येथे उपलब्ध आहेत. नाशिककरांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.