अकरावी प्रवेश प्रक्रिया
हाती प्रवेश घेण्याचा अर्ज.. त्यासोबत गुणपत्रकांसह आवश्यक ती महत्त्वपूर्ण कागदपत्रे.. महाविद्यालय प्रशासनाकडे अर्ज जमा करण्यासाठी झालेली गर्दी.. हे अकरावी प्रवेश प्रक्रियेचे नेहमीचे चित्र केंद्रिभूत अर्थात ऑनलाइन पद्धतीतही कायम राहिले. ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया असली तरी शिक्षण मंडळाकडून अद्याप काही निकषांची पूर्तता न होऊ शकल्याने ही प्रक्रिया गोंधळाच्या स्थितीत सुरू आहे. विद्यार्थ्यांप्रमाणे पालकही संभ्रमात आहेत.
दहावीचा निकाल लागल्यानंतर पालक आणि विद्यार्थ्यांना वेध लागतात ते अकरावी प्रवेश प्रक्रियेचे. एरवी चित्रपट, मालिकांमध्ये रंगविलेले महाविद्यालयीन विश्व अनुभवण्यासाठी तरुणाई उत्सुक असताना यंदा मात्र शिक्षण विभागाच्या ‘ऑनलाइन’ प्रयत्नांमुळे या आनंदावर काहीअंशी विरजण पडले आहे. निकाल जाहीर होताच केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा यात ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्यात सव्र्हर डाऊनसह अनेक तांत्रिक अडचणींना तोंड द्यावे लागले. दुसऱ्या टप्प्यात तंत्रज्ञानाला काहीअंशी सरावलेल्या विद्यार्थ्यांनी ही प्रक्रिया पार पाडली. मात्र एवढे करूनही आपल्याला पसंतीचे महाविद्यालय मिळते की नाही याबद्दलची धास्ती ठळकपणे समोर आली. दुसरीकडे, ऑनलाइन पद्धतीमुळे वशिल्यासह अन्य मार्गाने होणाऱ्या प्रवेशाला काहीअंशी चाप बसला. त्याचे पालक वर्गाने स्वागत केले. अकरावी प्रवेशासाठी गुणमर्यादा यादी जाहीर झाल्यानंतर बुधवारी सकाळपासून बहुतांश महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांसह पालकांच्या लांबच लांब रांगा लागल्या. महाविद्यालय प्रवेशद्वार तसेच दर्शनी भागात प्रवेश प्रक्रियेसंदर्भात आवश्यक सूचना, लागणारी कागदपत्रे याची माहिती देण्यात आली असली तरी पालक व विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला.
विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया
प्रवेशासाठी कमी मुदत
किशोर ठाकूर या पालकांनी प्रवेशासाठी अतिशय कमी मुदत मिळाल्याची तक्रार केली. काही पालक बाहेरगावी आहेत, काही कामात व्यस्त अशा स्थितीत ही मर्यादा वाढवणे गरजेचे आहे. प्रवेशासाठी एकच खिडकी दिल्याने रांगेत उभे राहण्याशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी नमूद केले.
विद्यार्थ्यांना त्रास
सायली योगेश यांनी वेगळ्याच मुद्दय़ाकडे लक्ष वेधले. ऑनलाइनमुळे प्रवेश प्रक्रियेत सर्वाना समान न्याय मिळणार असल्याचा आनंद आहे. पण आजही शिक्षण विभागाचा प्रवेश प्रक्रियेचा ऑनलाइन डाटा अपलोड झालेला नाही. गुणमर्यादा यादीसह अन्य प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक कोलमडल्याने विद्यार्थी त्यात नाहक भरडला जात असल्याची खंत व्यक्त केली.
प्रक्रिया किचकट
बीडहून आलेल्या विजयकुमार बोदडे यांनी प्रवेश प्रक्रिया किचकट केल्याचे सांगितले. वेळेवर काही कागदपत्रे मागितली तर वेळ वाया जाण्याची भीती आहे. सूचनेप्रमाणे कागदपत्रांची खातरजमा केली, पण ऐनवेळी काय होईल हे सांगता येत नसल्याचे ते म्हणाले.
धास्ती आहेच
वरद आचार्यने अकरावी प्रवेशाच्या धास्तीमुळे दहावी निकालाचा आनंदच साजरा करता आला नसल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवसांपासून संगणकासमोर बसून ऑनलाइन करायचे म्हणजे काय ते समजून घेण्यात वेळ गेला. प्रवेश प्रक्रियेचे दोन्ही टप्पे पार केल्यानंतर आजही प्रवेश कुठे व कधी मिळणार ही धास्ती आहेच. विद्यार्थ्यांचा खूप गोंधळ उडाल्याची तक्रार त्याने केली.
इच्छित प्रवेशाची साशंकता
वैष्णवी शिंदे हिने दहावीला गुण चांगले मिळाल्याने विज्ञान शाखेत जायचे असल्याचे सांगितले. पण आपण ज्या शाळेत शिकलो, त्यालगतच्या महाविद्यालयात गुणमर्यादा यादीत स्थान मिळेल की नाही, याबद्दल साशंकता असल्याचे नमूद केले.