दोन गृहरक्षकांना अटक; अमली पदार्थ बुटात लपवून पुरवठा
वेगवेगळ्या कारणांमुळे कायम चर्चेत असणाऱ्या नाशिक रोडच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्यांना गांजा पुरविण्याचे काम गृहरक्षक दलाचे काही जवान करत असल्याचे पुढे आले आहे. गांजा आपल्या बुटात लपवून तो कैद्यांपर्यंत पोहोचविला जात होता. या प्रकरणी गृहरक्षक दलाच्या दोन जवानांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.
नाशिक रोडचे मध्यवर्ती कारागृह वेगवेगळ्या कारणांनी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले असते. या ठिकाणी अतिशय गंभीर गुन्ह्यातील कैद्यांनाही ठेवण्यात आले आहे. कैद्यांना मिळणाऱ्या सोयी-सुविधांबाबत वारंवार तक्रारी होत असल्या तरी त्यावर कारागृह प्रशासनाने तोडगा काढल्याचे दिसले नाही. कैद्यांना हव्या असणाऱ्या सुविधा देण्यासाठी गृहरक्षक दलाचे काही जवानही कार्यप्रवण असल्याचे उघड झाले आहे.
मयूर दिलीप साबळे (२६) आणि सुरज अनिल साळवी (२३) हे गृहरक्षक दलाचे जवान कारागृहात तैनात होते. कैद्यांना गांजा पुरविण्याच्या उद्देशाने कामावर येताना ते आपल्या बुटात गांजा घेऊन यायचे. याची कुणकुण लागल्यावर कारागृह प्रशासनाने मंगळवारी सायंकाळी संबंधितांची झडती घेतली असता त्यावर शिक्कामोर्तब झाले. साबळे व साळवी यांच्या बुटात गांजा लपविल्याचे आढळले. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर दोघांविरुद्ध अमली पदार्थविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त श्रीकांत धिवरे यांनी दिली. संशयितांच्या बुटातून गांजाही हस्तगत करण्यात आला आहे.
कारागृहात कैद्यांना अमली पदार्थापासून ते भ्रमणध्वनीपर्यंत सर्व काही उपलब्ध असल्याचे प्रकार अधूनमधून उघड झाले आहेत. एका गुन्ह्यात कारागृहात असणाऱ्या कैद्याने भ्रमणध्वनीवरून मुंबईच्या एका व्यावसायिकाला खंडणीसाठी धमकावल्याचे उघड झाले होते. मुंबई पोलिसांनी कारागृहातून त्या कैद्यांना अटक केली होती. काही महिन्यांपूर्वी कारागृहाची सुरक्षा व्यवस्था भेदून काही कैद्यांनी पळ काढला होता. कैद्यांना अमली पदार्थ पुरविण्यात गृहरक्षक दलाच्या जवानांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यामुळे कारागृहात काय काय सुरू असते त्याची झलक समोर आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ganja supply in nashik road jail