आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता
कायद्याप्रमाणे दरमहा नियमीत व किमान वेतन द्यावे या मागणीसाठी येथील सामान्य रूग्णालयातील कंत्राटी कामगारांनी दोन दिवसांपासून कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनामुळे सामान्य रूग्णालयातील विविध सेवा विस्कळीत झाल्या असून त्यावर तात्काळ तोडगा निघाला नाही तर हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
कास्ट्राईब संघटनेचे तालुकाध्यक्ष भारत म्हसदे व कंत्राटी कामगार संघटनेचे अध्यक्ष विजय जगताप यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. सामान्य रूग्णालयात कंत्राटी तत्वावर एकूण ८० कामगार असून त्यातील अनेक जण गेल्या सात-सात वर्षांपासून कार्यरत आहे. या कामगारांना नियमित वेतन अदा केले जात नाही तसेच किमान वेतन कायद्यानुसार साडे सोळा हजार रूपये मासिक वेतन देणे आवश्यक असतांना केवळ पाच हजारात बोळवण केली जाते, अशी या कामगारांची तक्रार आहे.
गेल्या तीन महिन्यापासून वेतन थकले असून त्यामुळे उपासमारीला सामोरे जावे लागत असल्याकडे मोर्चेकऱ्यांनी लक्ष वेधले. या संदर्भात विचारणा केल्यावर संबंधित ठेकेदाराकडून उडवाउडवीचे उत्तरे दिली जातात असा, आरोप कामगारांनी केला.
कामगारांना भेडसावणाऱ्या या समस्येकडे लक्ष वेधल्यावर आपल्या अधिकार क्षेत्रातील बाब नाही म्हणून सामान्य रूग्णालय प्रशासन कानाडोळा करते तर दुसरीकडे ठेकेदार प्रतिसाद देत नसल्यामुळे कामगारांची कोंडी होत असून न्याय कुणाकडे मागावा, असा प्रश्न त्यांच्यापुढे उभा आहे. जिल्हा प्रशासनाकडे या कामगारांनी यापूर्वी आपली गाऱ्हाणी मांडली आहेत.
मात्र आपल्या मागण्यांची तड लागत नसल्याची भावना झाल्याने काम बंद करून सोमवारपासून सामान्य रूग्णालयासमोर संबंधितांनी ठिय्या दिला आहे. या आंदोलनामुळे मनुष्यबळाअभावी स्वच्छतेसह रूग्णालयातील विविध सेवा विस्कळीत झाल्या असून रूग्णांना त्याचा फटका बसत आहे.
रूग्णालय अधीक्षक डॉ.कांचन वनेरे यांनी कामगार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून या आंदोलनप्रश्नी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.
परंतु थकीत वेतन मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका पदाधिकाऱ्यांनी घेतली. त्यामुळे त्यावर तोडगा निघू शकला नाही. येत्या दोन दिवसात कोंडी फुटली नाही तर हे आंदोलन आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.