हरिगिरी महाराजांचा बाळा नांदगावकर यांना प्रश्न
राज ठाकरे नाशिकला येतात. साधुग्राममध्ये जाऊन आखाडय़ांना भेट देतात. मग, ते त्र्यंबकेश्वरला का नाही आले, असा प्रश्न श्रीपंचायती शंभु दशनाम जुना आखाडय़ाचे महंत हरिगिरी महाराज यांनी मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना केल्यावर क्षणभर त्यांना काय उत्तर द्यावे तेच सुचेना,
खुद्द नांदगावकर यांनी ही माहिती दिली. तिसऱ्या शाही पर्वणीनिमित्त शुक्रवारी नांदगावकर यांनी येथे रामकुंडात स्नान केले. तत्पूर्वी पहाटे साडेचारपासून रामकुंड परिसरात महापौर अशोक मुर्तडक, उपमहापौर गुरूमीत बग्गा यांसह उपस्थित नांदगावकर यांनी त्र्यंबकेश्वर येथील आखाडय़ांना भेट दिल्यावर आलेले अनुभव सांगितले. अलीकडेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे नाशिक दौऱ्यावर येऊन गेले. त्यांच्या समवेत असलेले नांदगावकर तेव्हापासून नाशिकमध्येच थांबले आहेत. यादरम्यान त्यांनी त्र्यंबकेश्वर येथील सर्व आखाडय़ांना भेट देत साधू, महंतांचे म्हणणे जाणून घेतले. आपण मनसेचे नेते असल्याचे हरिगिरी महाराजांना समजल्यावर त्यांनी प्रश्नांची सरबत्तीच सुरू केल्याचे नांदगावकर यांनी नमूद केले. राज ठाकरे हे नाशिकच्या आखाडय़ांमध्ये गेले. परंतु, त्र्यंबकमध्ये का आले नाहीत, आम्हांला का भेटले नाहीत, असे प्रश्न महाराजांनी उपस्थित केले. नाशिकप्रमाणेच त्र्यंबकही त्यांचे आहे, असा निरोपही त्यांनी राज यांना द्यावयास सांगितल्याचे नांदगावकर म्हणाले.
सिंहस्थानिमित्त सध्या नाशिक व त्र्यंबकेश्वर येथे अनेक राजकीय नेते भेट देत असून त्यापैकी काही जण रामकुंड तसेच कुशावर्त येथे स्नानाचा आनंदही घेत आहेत.
नाशिक महापालिकेत सत्तास्थानी असलेल्या मनसेचे नेतेही यात मागे नसून शुक्रवारी बाळा नांदगावकर यांनी रामकुंडात डुबकी तर मारलीच, शिवाय महापौर अशोक मुर्तडक, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्याप्रमाणे सूर मारत तीर गाठण्याचा प्रयत्न केला. परंतु, पाण्याच्या वेगामुळे ते काहीसे भरकटू लागल्याचे लक्षात येताच महापौरांनी त्यांना आधार देत तीरावर नेले.