नंदुरबार: चिरंजीव होण्याचा वरदान लाभलेला अश्वत्थामा हा सर्वांच्याच कुतूहलाचा विषय. भारतात अश्वत्थामाचे स्थान कुठेही नमुद नसले तरी सातपुडा रांगेत चार हजार फुट उंच पर्वतावर अस्तंबा ऋषी नावाने त्याचे स्थान आहे. शापस्थ अवस्थेतील जखमी अश्वत्थामा दऱ्याखोऱ्यात तेल मागतो आणि वेळप्रसंगी रस्ताहीन झालेल्या यात्रेकरुला मार्गदर्शन करतो, अशी दंतकथा असल्याने दरवर्षी धनत्रयोदशीपासून दोन दिवस हजारो भाविक अस्तंबाच्या यात्रेसाठी मार्गस्थ होतात. अस्तंभा नावाने ओळखली जाणारी यात्रा आजही अनेकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे.

अश्वत्थामाच्या मस्तकावर असलेल्या दिव्यमणीमुळे त्याने अनेक संकटांवर मात केली. महाभारतात पांचालीच्या पाच मुलांचा कटकारस्थानाने अश्वत्थामाने वध केला. त्यामुळे श्रीकृष्णाने त्यास भयंकर शाप देत मस्तकावरील मणी काढून घेत तु या जखमेने विव्हळशील, मृत्युची याचना करशील, परंतु तुला मृत्यू येणार नाही, असा शाप दिल्याची पुराणकथा आहे. महाभारतातील शापस्थ अश्वत्थामा आजही सातपुडा पर्वतरांगांमध्ये आपल्या मस्तकावरील जखम घेवून विव्हळत असून यात्रेदरम्यान भेटलेल्या यात्रेकरुकडून तेलाची मागणी करुन वेळप्रसंगी त्याला मार्ग देखील दाखवत असल्याची आख्यायिका असल्याने अस्तंभा ऋषींच्या यात्रेला अनन्यसाधारण महत्व आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा पर्वतरांगेतील सर्वात उंच पर्वत मानल्या जाणाऱ्या अस्तंभा पर्वतावर अस्तंभा ऋषीचे देवस्थान आहे. जवळपास चार हजार ३०० फुट उंचीवर वसलेल्या  शूलपाणीच्या झाडीमधल्या डोंगराच्या माथ्यावर मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्रातील हजारो भाविक येतात. शिखरावर पोहोचल्यानंतर त्या ठिकाणी एक शिळा आहे. त्याची भाविक पूजा करतात. त्यानंतर पुन्हा परतीच्या मार्गाला लागतात. शिखरावर अतिशय कमी जागा असली तरी तेथे प्रत्येकाला बसायला जागा मिळते. हा अश्वशत्थाम्याचा चमत्कार असल्याचे लोक सांगतात.

या शिखरावरून दिसणारा सूर्योदय तसेच तापीचे विहंगम दृश्य डोळ्यांचे पारणे फेडते. याठिकाणी जाण्याचा आणि परतीचा मार्ग वेगळा आहे. दिवाळीच्या पर्वात होणाऱ्या या यात्रेसाठी भाविकांच्या जत्थेच्या जत्थे रवाना होतात. तळोदा शहरातून कोठार-देवनदी-असली-नकट्यादेव- जुना अस्तंभा-भीमकुंड्या या मार्गाने चालत यात्रेला जातात.

जंगली श्वापदांना दूर ठेवण्यासाठी ढोल, आगीसाठी टायर, दिवट्या, टेंभे, मशाली अशा दीर्घ काळ जळणाऱ्या वस्तू या यात्रेत बरोबर घेतल्या जातात. रात्रीचा प्रवास करून अस्तंबा ऋषीच्या शिखरावर जाऊन धनत्रयोदशीला पहाटेच्या सुमारास दर्शन घेऊन ध्वज लावतात. या ठिकाणी डोंगरावर येणारे रोषा ही वनस्पती तोडून बरोबर घेतात. आदिवासी बांधव तळोदा येथे एकत्र येऊन ढोल-ताश्यांच्या गजरात मिरवणूक काढतात.