नंदुरबार – नव्या चादरी..स्वच्छ वार्ड…रुग्णालयाचा परिसर सुगंधीत द्रव्याने पुसलेला…वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून होणारी विचारपूस…तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांना तत्पर मिळणारी सेवा…सारे कसे स्वप्नवत. परंतु, एखाद्या पंचतारांकित हॉटेलमध्ये मिळावी अशी सेवेची अनुभूती नंदुरबारमधील शासकीय रुग्णालयामध्ये रुग्णांना आली. त्यास कारण ठरले राज्याचे आरोग्य मंत्री यांचा नंदुरबार जिल्हा दौरा.
अतिशय बिकट अवस्था झालेले आणि परिसर अस्वच्छ असलेली रुग्णालये, त्यातून येणारी दुर्गंधी, त्यातच वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी रुग्णसेवेकडे होणारे दुर्लक्ष, हे नंदुरबारमधील शासकीय वैद्यकीय दवाखाने आणि रुग्णालयांमध्ये नेहमी दिसणारे चित्र. याठिकाणी उपचारासाठी जंगलातून, डोंगर-दरी तुडवत येणाऱ्या आदिवासींना चांगली आरोग्य सेवा मिळणे दुरापास्तच. परंतु, आरोग्य मंत्र्यांचा दौरा जाहीर झाला. आणि एका रात्रीतून चमत्कार झाला. नंदुरबारमधील आरोग्य यंत्रणांचे एका दिवसासाठी का होईना चित्र बदलले.
राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर हे दोन दिवसाच्या नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर होते. आरोग्यमंत्री हे जिल्ह्यातील कोलमडलेल्या आरोग्य यंत्रणेचा आढावा घेवून जिल्ह्यातील अतिदुर्गम अशा अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यात पाहणी दौरा करुन आरोग्य सेवेचा आढावा घेणार होते. त्यामुळेच नंदुरबारमधील ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांचे रुप रातोरात बदलले. त्यामुळे दोन दिवसांसाठी का होईना रुग्णांना चांगली सेवा मिळाली.
मंत्र्याच्या दौऱ्यामुळे शासकीय रुग्णालयांचे आवार स्वच्छ झाले. इमारती धुवून सुंगध येईल, अशी व्यवस्था करण्यात आली. प्रत्येक खाटेवर गादी, नवी चादर मिळाली. रुग्णालयात नेहमी न दिसणारे वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी रुग्णांची आस्थेने विचारपूस आणि सुश्रृषा करतांना दिसले. रुग्णांना मिळणाऱ्या जेवणाचा दर्जा बदलला. मंत्र्याचा दौरा असल्याने औषधाचा तुटवडा दिसू नये म्हणून मुख्यालयातून दोन दिवस आधीपासूनच रुग्णालयाच्या गाड्या औषधी घेवून रवाणा होत होत्या.
मंत्री प्रकाश आबीटकरांनी नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा ग्रामीण रुग्णालय, डाब प्राथमिक आरोग्य केंद्र, मोलगी ग्रामीण रुग्णालय, बिलगाव प्राथमिक आरोग्य केंद्र. धडगाव उपजिल्हा रुग्णालय आणि तळोदा उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी केली. त्यांनी काही रुग्णांना मिळणाऱ्या सुविधेविषयी विचारले असता, हा चमत्कार आजच झाल्याचे रुग्णांनी सांगितल्याने आरोग्य सेवेच्या या धावपळीची पोलखोल झालीच. मात्र मंत्री येणार असल्याने रात्रीतून आरोग्य सेवा कशी बदलून दर्जेदार होते. याची प्रचिती अतिदुर्गम अक्कलकुवा आणि धडगाव तालुक्यातील आदिवासी रुग्णांना आली. त्यामुळे मंत्र्यांनी महिन्यातून एकदा तरी दौरा करुन अचानक रुग्णालयांची तपासणी करावी, अशी अपेक्षा आदिवासी रुग्णांकडून केली जात आहे.