शिक्षण विभागाचा प्रयत्न, मोफत समुपदेशनाने उपक्रमाची सुरुवात

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चारूशीला कुलकर्णी, नाशिक

नाशिक :  करोना संसर्गामुळे  शिक्षण विभागाने टाळेबंदीआधी शाळा, महाविद्यालय बंद केले होते. शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे विद्यार्थी घरात बंद झाले. करोनाची टांगती तलवार सर्वावर असतांना टाळेबंदीच्या या वेळेचा उपयोग शिक्षण विभाग ‘ई-लर्निग’चा दर्जा सुधारण्यासाठी करत आहे. नवीन शैक्षणिक वर्षांसाठी ई-लर्निगच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या उपक्रमांची ओळख करून देण्याचा शिक्षण विभागाचा प्रयत्न आहे. या उपक्रमाची सुरूवात सध्या राज्य शिक्षण मंडळाकडून मोफत समुपदेशनाने केली आहे.

सर्वत्र लागु असलेल्या टाळेबंदीमुळे विद्यार्थी वर्ग कमालीचा अस्वस्थ झाला आहे. शाळा-महाविद्यालये बंद आहेत. ते कधी सुरू होतील, याविषयी अनिश्चितता असतांना ‘ऑनलाईन’च्या माध्यमातून शिक्षण विभाग या सर्व विद्यार्थ्यांशी जोडला गेला आहे. दुसरीकडे, १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या मनातील अभ्यासाविषयी आणि नव्या शैक्षणिक वर्षांविषयीची भीती दूर करण्यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक आणि समुपदेशक यांची सेवा उपलब्ध करून दिली आहे.१० वी आणि १२ वी नंतर पुढे काय, करिअरच्या विविध वाटा, मानसिक गोंधळ, अस्वस्थता, करोना प्रादुर्भाव यासह १० वी कल आणि अभिक्षमता चाचणी याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्यासाठी नाशिक विभागात ३३ समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मंडळाच्या संकेतस्थळावर संबंधितांची नावे, त्यांचे संपर्क क्रमांक याची माहिती देण्यात आली आहे. मे महिन्याच्या अखेरीस ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा सुरू होतो. परंतु, करोनाच्या पार्श्वभूमीवर ही कामे बंद आहेत. शिक्षण विभागाकडून या पार्श्वभूमीवर एक नवे अ‍ॅप तयार करण्यात आले असून विद्यार्थ्यांना घर बसल्याही माहिती उपलब्ध होईल, अशी माहिती नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक पुष्पावती पाटील यांनी दिली.  याशिवाय बीड येथील एका शाळेने १० वी अभ्यासक्रमावर आधारित काही चित्रफिती तयार केल्या आहेत. या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्या त्या विषयाच्या तोंडओळखसह सखोल माहिती मिळेल. दृकश्राव्य माध्यमातून त्या संकल्पना अधिक स्पष्ट होतील. ही सर्व सेवा मोफत आहे. तसेच १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘अ‍ॅप’ विकसित करण्यात येत असून ऑनलाईन परीक्षा घेतल्या जातील. उत्तरपत्रिका तपासून त्रुटींची माहिती दिली जाईल, असे पाटील यांनी नमूद केले.

विद्यार्थ्यांसाठी दृकश्राव्य माध्यमातून वेगवेगळे प्रयोग

पहिल्या टप्पात १० वी आणि १२ वीतील विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न होत असतांना दुसरीकडे पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासात कसे गुंतवून ठेवता येईल, यापेक्षा त्यांचा अभ्यास आनंददायी करण्यासाठी तंत्रस्नेही शिक्षकांची फळी काम करत आहे. नाशिक जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागातील शिक्षक दृकश्राव्यच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयोग करत असून विद्यार्थ्यांसाठी ते लवकरच खुले होतील.

– पुष्पावती पाटील (नाशिक विभागीय उपसंचालक)

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Introducing various activities to the students through e learning zws