नाशिक : गृहनिर्माण प्रकल्पातील आठ घरांना वीज जोडणी देण्यासाठी २४ हजार रूपयांची लाच स्वीकारणाऱ्या येथील जेलरोड, शिवाजीनगरातील महाराष्ट राज्य विद्यु वितरणच्या कनिष्ठ अभियंत्यास मंगळवारी जिल्हा सत्र न्यायालयाने एक वर्ष सक्तमजुरी आणि दोन हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.
तक्रोरदार गृहनिर्माण प्रकल्पाचा अध्यक्ष असतांना आठ नवीन वीज जोडणी देण्यासाठी कनिष्ठ अभियंता दीपक चौधरीने २४ हजार रूपयांची मागणी केली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधल्यावर त्यांनी २१ जुलै २०१६ रोजी पडताळणी करून सापळा रचला. चौधरी यास तक्रोरदाराकडून २४ हजार रूपयाची लाच पंच, साक्षीदारांसमक्ष स्वीकारतांना रंगेहात पकडण्यात आले. यासंदर्भात उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्य़ाचा तपास करून नाशिकच्या न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. या खटल्याचा मंगळवारी जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. एस. टी. पांडेय यांनी निकाल दिला. चौधरी यास एक वर्ष सक्तमजुरी आणि दोन हजार रूपये दंड अशी शिक्षा त्यांनी ठोठावली. खटल्यात सरकारी पक्षातफे सहाय्यक सरकारी अभियोक्ता योगेश कापसे यांनी काम पाहिले.