शहर-ग्रामीण भागात एकाच दिवसात ४ हजार ७७२; रुग्ण प्रवेशपत्र घेण्यासाठी व्यावसायिकांची गर्दी

नाशिक : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर निर्बंध अधिक कठोर केले गेले असताना सोमवारी व्यापारी, व्यावसायिकांमध्ये कमालीचे संभ्रमाचे वातावरण पसरले होते.

जीवनावश्यक वस्तू वगळता उर्वरित सर्व दुकाने, बाजारपेठा, हॉटेल, परमिट रूम, मद्याची दुकाने ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत. अनेक व्यापाऱ्यांचा ही बंदी केवळ शनिवार, रविवारपुरती मर्यादित असल्याचा समज झाला. त्यामुळे सोमवारी मेनरोडसह आसपासच्या बाजारपेठेतील व्यावसायिकांनी व्यापाऱ्यांसाठीचे प्रवेशपत्र घेण्यासाठी गर्दी केली. दुसरीकडे कठोर निर्बंधाची जाणीव झालेल्या मद्यप्रेमींनी मात्र आवश्यक तो साठा करण्याकडे कल ठेवला.

शहर आणि ग्रामीण भागात करोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. एकाच दिवसात ४७७२ नवीन रुग्ण सापडल्याचा उच्चांक नोंदविला गेला. त्यामध्ये नाशिक शहरातील तीन हजारहून अधिक तर ग्रामीण भागातील १५६५ आणि मालेगाव शहरातील ७१ रुग्णांचा समावेश आहे. करोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी निर्बंध आणखी कठोर करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी सोमवारी रात्रीपासून होणार आहे. याआधी नाशिकमध्ये शनिवार, रविवार या दोन्ही दिवशी बाजारपेठा बंद ठेवल्या जात होत्या. त्याची राज्यस्तरावर अंमलबजावणी झाली. यामुळे आठवडय़ातील उर्वरित पाच दिवस जीवनावश्यक वगळता अन्य वस्तूंची दुकाने सुरू राहतील, असे अनेकांना वाटत होते. तथापि, जिल्हा प्रशासनाने शासकीय निर्बंधाची अधिसूचना काढल्यानंतर अनेक बाबी स्पष्ट झाल्या.

सोमवारी मुख्य बाजारपेठेसह उपनगरांमधील सर्व दुकाने नेहमीप्रमाणे सुरू होती. परंतु, बाजारपेठेत फारशी गर्दी नव्हती. मध्यवर्ती बाजारपेठेत प्रवेश नियंत्रणासाठी नि:शुल्क प्रवेशपत्राची व्यवस्था करण्यात आली. मेनरोड, सराफ बाजार, दहीपूल आसपासच्या व्यापाऱ्यांनी हे प्रवेशपत्र मिळवण्यासाठी सराफ बाजार पोलीस चौकीत गर्दी केली होती. आसपासच्या व्यापाऱ्यांना नेमके निर्बंध कसे असतील याची कल्पना नव्हती.  काहींना केवळ शनिवार, रविवारचे निर्बंध असल्याचा समज झाला. कोणती दुकाने सुरू राहतील, मद्याची दुकाने व परमिट रूमला परवानगी आहे का, असे एक ना अनेक प्रश्न प्रशासकीय यंत्रणेकडे विचारले जात होते.

निर्बंध कसे?

शासनाने निर्बंधांबाबत अतिशय सुस्पष्ट पूर्वकल्पना दिली आहे. त्याची स्थानिक पातळीवर जशीच्या तशी अमलबजावणी केली जाणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे. या काळात जीवनावश्यक वस्तुंची दुकाने, भाजीपाला दूध, वृत्तपत्र वितरण नियमितपणे सुरू राहणार आहे. मॉल, प्रार्थनास्थळे, बाजारपेठा, हॉटेल, उपहारगृहे बंद राहणार आहेत. खासगी आणि सार्वजनिक वाहतूक नियमितपणे सुरू राहील. रिक्षात दोन प्रवासी आणि चालक तर, टॅक्सीमध्ये निम्म्या क्षमतेने प्रवासी प्रवास करू शकतील. दिवसा सकाळी सात ते रात्री आठ या वेळेत जमावबंदी तर रात्री आठ ते सकाळी सात वाजेपर्यंत कुणालाही योग्य कारणाशिवाय बाहेर फिरता येणार नाही. शेतीविषयक कामे, कृषिमाल, अन्नधान्य वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीत राहणार आहे.

शासन, प्रशासनाच्या आदेशात अनेक बाबींविषयी संभ्रमावस्था आहे. उद्योग, वाहतूक, शेतीची कामे, बँकिंग व्यवहार सुरू राहणार. पण, संबंधितांना निकडीच्या वस्तू, सुट्टे भाग देणाऱ्या सर्व आस्थापना बंद राहणार. नेमके यात नियोजन काय आहे, हा प्रश्न आहे. याची स्पष्टता नसल्याने संभ्रमाचे वातावरण आहे. शासनाने टाळेबंदी केली आहे. केवळ त्याला तसे नांव न देता सर्व गोष्टी तशाच अंतर्भूत केल्या आहेत. यामुळे संभ्रम वाढला असून त्याची स्पष्टता होण्याची गरज आहे. मध्यंतरी पाच रुपये प्रवेश शुल्काबाबत अशीच अस्पष्टता होती. त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणीत अडचणी असल्याने तो निर्णय मागे घ्यावा लागला. त्यामुळे नव्या निर्बंधाबाबत तसे काही होईल, अशी शक्यता वाटते. शासनाने घेतलेला निर्णय अव्यावहारिक असला तरी व्यापारी वर्ग सामाजिक भान राखून त्याचे पालन करण्यास कटिबद्ध आहे.

– संतोष मंडलेचा (अध्यक्ष, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर)

शासनाचे आदेश जिल्ह्य़ात पूर्णत: लागू करण्यात आले आहेत. जीवनावश्यक बाबी सोडून सर्व दुकाने, मॉल, बाजार बंद राहणार आहे. यापूर्वी जिल्ह्य़ासाठी काढलेल्या आदेशातील या आदेशाहून अधिक कठोर असलेले निर्बंध तसेच पुढे सुरू ठेवण्यात येतील.

– सूरज मांढरे  (जिल्हाधिकारी, नाशिक)