मालेगाव : शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्याचा आणि नियोजित वेळेपेक्षा दोन ते तीन दिवस विलंबाने पाणीपुरवठा होण्याचा प्रकार गेल्या तीन आठवड्यात चौथ्यांदा घडल्याने ऐन सणासुदीच्या दिवसांत शहरवासीयांना पाणीटंचाईची झळ सोसावी लागत आहे. वारंवार उद्भवणाऱ्या या समस्येमुळे शहरातील पाणीपुरवठ्याचा बट्टयाबोळ झाल्याचे अधोरेखित होत आहे. वरकरणी तांत्रिक अडचणींमुळे हा पाणीपुरवठा खंडित होत असल्याचे दिसत असले तरी यानिमित्ताने महापालिका प्रशासनाची अकार्यक्षमता देखील पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.
गेली काही दिवस शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्याचा प्रकार वारंवार समोर येत आहे. मुख्य जलवाहिनी फुटल्याने गेल्या महिन्यात शहरात काही ठिकाणी दोन दिवस तर काही ठिकाणी नियोजित वेळेपेक्षा तीन दिवस विलंबाने पाणीपुरवठा होऊ शकला. पावसाचा व्यत्यय आल्याने दोन दिवसापेक्षा जास्त काळ जलवाहिनी दुरुस्तीच्या कामास वेळ लागला होता. त्यानंतर दुरुस्त करण्यात आलेल्या या जलवाहिनीला पुन्हा गळती लागल्याने ती दुरुस्त करणे आवश्यक बनले. त्यामुळे गेल्या ३ व ४ ऑक्टोबर रोजी जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घ्यावे लागले.
जलवाहिनी दुरुस्तीच्या या कामामुळे पाणीपुरवठा पुन्हा प्रभावित झाला. यावेळी देखील शहरातील बहुतांश भागात पाणीपुरवठा बंद ठेवावा लागला. त्यामुळे नियोजित वेळेपेक्षा शहरवासीयांना ४८ तास उशिराने पाणी मिळाले. शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी बुधवारी रात्री तिसऱ्यांदा फुटण्याचा प्रकार घडला आहे. तिच्या दुरुस्तीसाठी पुन्हा पाणीपुरवठा खंडित करावा लागला.जलवाहिनी दुरुस्तीचे हे काम युद्ध पातळीवर सुरू असतानाच शुक्रवारी दुपारी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गिरणा पंपिंग स्टेशनवरील रोहित्र तसेच वीज वाहक तारा जळून खाक झाल्या.
विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून ही आग वेळीच विझवली म्हणून मोठा अनर्थ टळला. त्यानंतर धावपळ करत पर्यायी रोहित्राच्या सहाय्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. कधी जलवाहिनी गळती तर कधी विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या कारणामुळे शहरातील पाणीपुरवठा खंडित होण्याचे प्रकार वाढल्यामुळे पाण्यासाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागत असल्याने महापालिकेच्या कारभाराबद्दल लोकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. त्यातच महापालिका प्रशासनाचा अकार्यक्षम कारभाराचा फटका देखील नागरिकांना सोसावा लागत आहे.
पाणीपुरवठा खंडित होत असल्याबद्दलची पूर्वकल्पना नागरिकांना वेळेवर देण्याची तसदी महापालिकेकडून घेतली जात नसल्याची प्रचिती वारंवार येत आहे. त्यामुळे नागरिकांना मोठी गैरसोय सहन करावी लागत आहे. तसेच पाण्याच्या प्रतीक्षेत तासनतास ताटकळत बसण्याची वेळ येत आहे. गेल्या महिन्यात पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी मध्यरात्री फुटल्यानंतर दुसऱ्या दिवशी सायंकाळी पाणीपुरवठा विलंबाने होणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून कळविण्यात आले.
शुक्रवारी ज्या भागात पाणीपुरवठा नियोजित होता, तेथे सहा ते सात विलंबाने पाणीपुरवठा होईल,असे महापालिकेतर्फे कळविण्यात आले. परंतु बऱ्याच ठिकाणी सांगितल्याप्रमाणे पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे पाण्यासाठी लोकांना दिवसभर व रात्री उशिरापर्यंत जागरण करावे लागले. बऱ्याच प्रतीक्षेनंतर जाहीर केल्याप्रमाणे पाणी येणार नसल्याबद्दल व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मध्यरात्रीच्या सुमारास लोकांना संदेश पाठविण्यात आले. काही भागात तर तेवढी तसदी देखील घेतली गेली नाही. त्यामुळे पाण्यासाठी लोकांना खुपच मनःस्ताप सहन करावा लागला.
शुक्रवारी विस्कळीत झालेला हा पाणीपुरवठा अद्याप सुरू झालेला नाही आणि तो कधी सुरू होईल,हेही अद्याप महापालिकेच्या वतीने कळविण्यात आलेले नाही. मालेगाव शहरात आधीच दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. तोही वेळेवर करता येत नसल्याने महापालिका प्रशासनाबद्दल लोकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या आहेत.