वैद्यकीय भरतीसाठी महापालिकेत गर्दी; करोनाचे नियम धाब्यावर

नाशिक : करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर, महापालिकने वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची मानधन तत्वावर भरती सुरू केली आहे. त्या अंतर्गत सोमवारी एएनएम-परिचारिका पदांसाठी मुलाखत प्रक्रिया पार पडली. पदे २०० असली तरी मुलाखतीसाठी एक ते दीड हजार उमेदवार आले. महापालिका परिसरात एकच गर्दी झाली. करोनाशी संबंधित नियमावलीचे पालन झाले नाही. सायंकाळी उशिरापर्यंत साडेतीनशे जणांची मुलाखत झाल्याचे सांगण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत महापालिकेने मानधन तत्वावर वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, एएनएम (परिचारिका) आणि तंत्रज्ञांची भरती केली होती. दुसऱ्या लाटेत अकस्मात रुग्णांची संख्या वाढल्याने मनपा रुग्णालय, करोना काळजी केंद्रांचे व्यवस्थापन जिकीरीचे ठरले होते. त्यामुळे तेव्हा अगदी वेळेवर भरती प्रक्रिया राबविण्याची वेळ आली होती. संभाव्य तिसऱ्या लाटेत तशी स्थिती उद्भवू नये म्हणून पूर्वतयारीच्या दृष्टीकोनातून महापालिकेने ४० वैद्यकीय अधिकारी, २८ पदव्युत्तर डॉक्टर, ५० परिचारिका (स्टाफ), २०० एएनएम (परिचारिका), १० तंत्रज्ञ ही पदे भरण्याची प्रक्रिया हाती घेतली आहे. स्टाफ नर्सच्या ५० जागांसाठी सुमारे १२०० उमेदवारांनी हजेरी लावली होती. एएनएम अर्थात परिचारिकांच्या २०० जागांसाठी सोमवारी त्याची पुनरावृत्ती झाली. या पदाच्या मुलाखतीसाठी जवळपास एक ते दीड हजार उमेदवार आले होते.

गर्दीच्या नियोजनासाठी सुरक्षारक्षकांची मदत घ्यावी लागली. दोन रांगांमध्ये महिला उमेदवारांना बसविण्यात आले. महापालिका परिसर उमेदवारांनी भरून गेला. सायंकाळपर्यंत उमेदवार येत होते. त्यामुळे सायंकाळी पाचनंतर आलेल्यांना अखेर रोखण्यात आल्याचे वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मानधन तत्वावरील भरतीत यापूर्वी ज्यांनी करोना काळात काम केले, त्यांना प्राधान्य दिले जात असल्याचे उमेदवारांकडून सांगण्यात आले. सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ३५० जणांची मुलाखत प्रक्रिया पार पडली होती. आणखी ४०० ते ५०० उमेदवारांची मुलाखत प्रक्रिया बाकी असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. गर्दीमुळे सुरक्षित अंतराचे पथ्य गळून पडले. ज्यांची मुलाखत उशिराने होणार होती, ते आवारात रांगेत बसले होते. राजीव गांधी भवनमध्ये पहिल्या मजल्यावर नियुक्त पॅनलकडून मुलाखती घेण्यात आल्या. तिथेही बाहेरील बाजुस उमेदवारांची रांग होती.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: More than a thousand candidates present two hundred posts ssh
First published on: 27-07-2021 at 03:15 IST