नंदुरबार – प्रगत आणि पुरोगामी म्हटल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात सिकलसेल आजार असल्याने महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश नाकारण्यात आल्याची व्यथा पीडितेने गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडत मदतीची विनवणी केली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित मुलीला परिचारिका अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मदत करण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली.

नंदुरबारमध्ये सिकलसेल दिनाचे औचित्य साधून बाधितांसाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभीच जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी बाधितांना त्यांच्या अडचणी मांडण्याचे आवाहन केले. यावेळी आपणास होणारा त्रास सांगतांना बाधितांचे डोळे भरुन येत होते. शहादा तालुक्यातील एका युवतीने गावात शिक्षण झाल्यावर पुढील शिक्षणासाठी सिकलसेलमुळे महाविद्यालयात प्रवेश नाकारण्यात आल्याचे मांडले.

जिल्हाधिकारी डाॅ. सेठी यांनी त्वरीत तिच्या पुढील शिक्षणाची व्यवस्था करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या. याआधी जिल्हा रुग्णालय तसेच शासकीय दवाखान्यामध्ये योग्य उपचार मिळत नसल्याने खासगी रुग्णालयात उपचारासाठी गाय आणि घरातील किंमती वस्तू विकाव्या लागल्याचे सांगतांना एका पीडितेला रडू आले. जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी आरोग्य यंत्रणा तुटपुंजी असल्यामुळे सिकललेस बाधितांवर उपचारासाठी प्रयत्न तोकडे पडत असल्याची कबुली दिली. पुढील दोन वर्षात आठ लाख आदिवासी बांधवांची सिकलसेलसंबंधित तपासणी पूर्ण करणार असल्याचे सांगितले. या मोहिमेचा भाग म्हणून धडगाव तालुक्यातील ३० हजार जणांची तपासणी पूर्ण झाली असून त्यांचे अहवालही मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

जिल्हाधिकारी डॉ. सेठी यांनी यापुढे सिकलसेल बाधितांसाठी पुढील वर्षभर पुरेल इतक्या औषधांची खरेदी करुन प्राथमिक आरोग्य केंद्रांना त्यांचे वितरण करण्यात येईल, तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयात सिकलसेल कक्षाची स्थापना केली जाणार असल्याचे नमूद केले. गरोदर मातांसाठी सिकलसेल तपासणी अनिवार्य असून सातव्या महिन्यात गरोदर मातांनी डोक्यावर हंडा ठेवून पाणी आणण्याचे टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले.

यापुढे प्रशासनाच्या युट्युब चॅनलवर सिकलसेल संदर्भातील माहिती भिली आणि पावरी भाषेत प्रसारीत करुन सिकलसेल ग्रस्तांना आजाराविषयीची सर्व माहिती दिली जाईल, असे जिल्हाधिकारी डाॅ. सेठी यांनी सांगितले. या कार्यक्रमात सिकलसेस बाधितांना अपंग प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.