नाशिक – नाशिकरोड परिसरातील गावांमध्ये बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. वडनेर दुमाला गावातील लष्करी जवानांच्या वसाहतीतून दोन वर्षाच्या बालकाला बिबट्याने फरफटत नेल्यानंतर वन विभागाने परिसरात पिंजरे लावले. बिबट्यासाठी लावलेल्या पिंजऱ्यात तरस अडकले.

वडनेर दुमाला परिसरात महिनाभरात बिबट्याच्या हल्लात दुसरा बळी गेल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. वनविभागाच्या वतीने वडनेर दुमाला, पिंपळगाव खांब, विहितगाव, आर्टिलरी सेंटर परिसरात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी १३ पिंजरे लावले आहेत. आर्टिलरी सेंटरपुढील एका मळ्यात लावलेल्या पिंजऱ्यात बुधवारी रात्री तरस अडकले.

वनविभागाला याविषयी माहिती दिल्यानंतर तरसाला सुरक्षितरित्या उपचार केंद्रात दाखल करण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सुमीत निर्मळ यांनी दिली. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाच्या वतीने १३ पिंजऱ्यांसह ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले आहेत. श्वानपथकाच्या मदतीने बिबट्याचा माग घेण्यात येत आहे. मात्र बिबट्या अजूनही वनविभागाच्या हाती लागलेला नाही.

नाशिक पश्चिम भागात पेठ, हरसूल, बाऱ्हे, सिन्नर, नाशिक, त्र्यंबक, ननाशी हा परिसर येतो. जानेवारीपासून आतापर्यंत या विभागात पाच जणांवर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात मृत्यू झालेले पाचही जण बालके होती. जानेवारीत सिन्नर तालुक्यात १० वर्षीय जान्हवी, सप्टेंबरमध्ये सिन्नर तालुक्यातच १० वर्षांचा सारंग थोरात, दीड वर्षांचा गोलु शिंगाडे, वडनेर दुमाला परिसरात आयुष भगत आणि मंगळवारच्या हल्ल्यात श्रृतीक यांचा मृत्यू झाला आहे.

वन विभागाच्या वतीने या पैकी श्रृतीक वगळता अन्य चार बालकांच्या पालकांना प्रत्येकी २५ लाख रुपये नुकसान भरपाई दिली. तर श्रृतीक याच्या संदर्भात प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांनाही वनविभागाच्या वतीने मदत देण्यात येईल. याशिवाय पशुधनावर झालेल्या हल्ला विषयी नुकसान भरपाई देण्यात येत आहे.