नाशिक – सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिक येथे ११५० एकर तर, त्र्यंबकेश्वरमध्ये २१२ एकर क्षेत्रावर साधूग्राम साकारण्याचे नियोजन आहे. यातील तपोवनातील आरक्षित सुमारे ३०० एकर जागेचे कायमस्वरुपी संपादन तर उर्वरित ७५० एकर जागा तात्पुरत्या स्वरुपात अधिग्रहित केली जाणार आहे. कुंभमेळा प्राधिकरण पुढील दोन महिन्यात तपोवनातील जागा संपादित करण्याची प्रक्रिया सुरू करीत आहे.

गोदावरी काठावर २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याची तयारी सुरू झाली आहे. देशभरातून येणाऱ्या लाखो साधू-महंतांची निवासासाठी तपोवनात साधूग्रामची उभारणी केली जाते. तपोवन परिसरात साधूग्रामसाठी सुमारे ३५० एकर जागा पूर्वी निश्चित केलेली आहे. हा संपूर्ण परिसर ना विकास क्षेत्र म्हणून घोषित आहे. या जागेचा १२ वर्षातून एकदा होणाऱ्या कुंभमेळ्यात वापर होतो. ती कायमस्वरुपी संपादित न केल्यास भविष्यात कुंभमेळ्यात येणाऱ्या साधू-महतांसाठी जागा राहणार नसल्याचा इशारा साधू-महंतांकडून वारंवार दिला गेला होता. त्यामुळे शासनाने आगामी कुंभमेळ्यापूर्वी साधारणत: ३०० एकर जागा संपादित करण्याची तयारी केली आहे. विकास कामांसाठी पहिल्या टप्प्यात उपलब्ध केलेल्या निधीत १०५० कोटी रुपये साधूग्रामच्या भूसंपादनासाठी आहेत.

नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह यांनी साधूग्रामचे नियोजन आणि भूसंपादनाविषयी माहिती दिली. नाशिकमध्ये ११५० एकर क्षेत्रावर साधूग्रामचे नियोजन केले जात आहे. यातील तपोवनात ३७७ एकर जागा आरक्षित आहे. त्यातील काही जागा आधीच संपादित झाली असून उर्वरित सुमारे २८३ एकर जागेसाठी कायमस्वरुपी भूसंपादन प्रक्रिया राबविली जाणार आहे. पुढील दोन, तीन महिन्यात ही प्रक्रिया सुरू होईल. आगामी कुंभमेळ्यात संपादित केलेल्या जागेवर साधूग्रामची उभारणी होईल, असा विश्वास सिंह यांनी व्यक्त केला. कुंभमेळ्यातील संभाव्य गर्दी लक्षात घेऊन ७५० एकर जागा तात्पुरती अधिग्रहित केली जाणार आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये २१२ एकर जागेवर साधूग्राम साकारले जाईल असे त्यांनी नमूद केले.

नाशिक येथे वैष्णवपंथीय तीन तर, त्र्यंबकेश्वर येथे शैवपंथीय १० आखाडे आहेत. त्र्यंबकेश्वरमधील बहुसंख्य शैवपंथींय आखाड्यांकडे स्वत:ची जागा आहे. नाशिक येथे वैष्णवपंथीय आखाड्यांकडे तशी स्थिती नाही. मुदतीत तपोवनातील जागा अधिग्रहीत न केल्यास ती हातातून निघून जाईल, अशी साशंकता साधू-महंतांनी व्यक्त केली होती. भूसंपादनामुळे वैष्णवपंथीय आखाड्यांना कुंभमेळ्यात शहरात हक्काची जागा उपलब्ध होणार आहे.