तीन संशयितांना अटक

सिडकोतील मयूर देवरे या युवकाचे अपहरण करत तपोवन परिसरात त्याची हत्या केल्याच्या धक्कादायक घटनेमागे व्ही. एन. नाईक महाविद्यालयात शिक्षण घेणारे त्याचे वर्गमित्रच सहभागी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. महिनाभरापूर्वी संबंधितांमध्ये काही किरकोळ स्वरुपाचे वाद झाले होते. त्याचा राग मनात धरून संशयितांनी डोक्यात दगड मारून आणि चामडी पट्टय़ाने गळा आवळून मयूरची हत्या केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तीन जणांना अटक केली असून आणखी काही जणांचा शोध सुरू आहे. महाविद्यालयात युवकांमधील किरकोळ स्वरुपाचे वाद कोणत्या थरापर्यंत जाऊ शकतात हे या घटनेने समोर आले.

दीपावलीचा सण उत्साहात साजरा होत असतानाच ही घटना घडली होती. पाडव्यानिमित्त आयोजित गाण्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी सिडकोतील खंडेराव चौकात वास्तव्यास असणारा मयूर नरेंद्र देवरे हा मित्र सर्वेश पवार याच्या समवेत काठे गल्लीत आला होता. त्यावेळी संशयितांनी त्यांना बळजबरीने म्हसरूळ टेकमधील बंडू वस्ताद तालीम येथे नेऊन वाद घातला. सर्वेश पवारची मोटरसायकल व भ्रमणध्वनी घेऊन मयूरला संशयित तपोवन परिसरात घेऊन गेले. या ठिकाणी त्याच्या डोक्यात पेव्हर ब्लॉकचा गट्टा मारण्यात आला. चामडी पट्टय़ाने गळा आवळून मयूरचा खून करण्यात आला.

या प्रकरणी गुन्हा दाखल करत पोलिसांनी चौकशीला सुरूवात केली. त्यावेळी यात वर्ग मित्रांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. मयूर हा कॅनडा कॉर्नरलगतच्या व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेत शिक्षण घेत होता. महिनाभरापूर्वी वर्गातील काही युवकांशी त्याचे वाद झाले होते. त्यातील काही जण त्याच्या घर परिसरालगत वास्तव्यास होते. तेव्हाचे वाद मिटल्यानंतर संबंधितांमध्ये खुनशीने का पहातो यावरून धुसफूस सुरू होती.

हा राग मनात ठेऊन त्याच्या सोबत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्याची निर्घूणपणे हत्या केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या प्रकरणी आतापर्यंत दीपक गोकुळ राणे (१७) आणि सुशांत सुनील देखणे (१७, दोघेही राहणार सिडको) तसेच सर्वेश विजय बोरसे (१७, इंदिरानगर) यांना अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. संशयितांमध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचाही समावेश आहे. अन्य संशयितांचा शोध सुरू असून लवकरच त्यांनाही अटक केली जाईल, असे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.