पाणी गळती थांबविणे, जलवाहिन्या बदलणे, वॉल्व्ह दुरुस्ती अशी वेगवेगळ्या भागांतील कामे एकाच दिवशी हाती घेतली जाणार आहेत. त्यामुळे शनिवारी संपूर्ण शहरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. रविवारी सकाळी कमी प्रमाणात पाणीपुरवठा करण्यात येईल.

महापालिकेच्या पाणीपुरवठा व्यवस्थेतील अडचणी दूर करण्याचे काम पाणीपुरवठा विभागाने हाती घेतले आहे. गंगापूर धरणातून उचललेले पाणी बारा बंगला जलशुद्धीकरण केंद्रात आणले जाते. या जलवाहिनीतून सिद्धार्थनगर कालवा येथे मोठय़ा प्रमाणात गळती होत आहे. सुरळीत पाणीपुरवठय़ासाठी ही गळती थांबविणे आवश्यक आहे. हे काम शनिवारी केले जाणार आहे.

याशिवाय, पंचवटी जलशुद्धीकरण केंद्रातील ९०० मिलिमीटर जलवाहिनी बदलणे, कोणार्कनगर येथे रायझिंग जोडणी करणे, म्हसरूळ येथील मुख्य वॉल्व्ह बदलणे, कालिका पंपिंग स्टेशन येथील वॉल्व्हची दुरुस्ती, गांधीनगर जलशुद्धीकरण केंद्रातही वॉल्व्ह दुरुस्ती, नाशिकरोडच्या पवारवाडी, नवीन नाशिकमधील मुख्य वाहिनीवर जोडणी, शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रात वाहिनीची दुरुस्ती आदी कामे केली जाणार आहेत.

या कामामुळे गंगापूर आणि मुकणे धरणातून शहरास होणारा पाणीपुरवठा शनिवारी सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत बंद ठेवला जाणार आहे. तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी सकाळी पाणीपुरवठा कमी दाबाने आणि कमी प्रमाणात होईल, असे पाणीपुरवठा विभागाने कळविले आहे.