नाशिक : जवळपास संपुष्टात आलेला जुना कांदा आणि पावसाच्या तडाख्याने नव्या कांद्याची घटलेली आवक यामुळे भाव दिवसागणिक नवी उंची गाठत आहे. शुक्रवारी लासलगाव बाजार समितीत प्रति क्विंटलच्या दरात ५०० रुपयांनी वाढ होऊन त्याने सात हजाराचा टप्पा ओलांडला. पिंपळगाव बाजार समितीत सरासरी दर साडेसात हजारापर्यंत वधारले. लासलगाव बाजारात केवळ दीड हजार क्विंटल, तर पिंपळगावच्या बाजार समितीत केवळ ९०० क्विंटलची आवक झाली.
दिवाळीनंतर नवीन कांद्याची आवक सुरू होते. यंदा अवकाळी पावसाच्या तडाख्याने जिल्ह्य़ातील शेतीचे अतोनात नुकसान झाले. यामध्ये कांदा क्षेत्राचे प्रमाण मोठे आहे. काढणीवर आलेला कांदा पाण्याखाली गेल्याने सडला. या नुकसानीमुळे नव्या कांद्याची आवक कमालीची घटली आहे. कांद्याच्या सर्वात मोठय़ा लासलगाव बाजार समितीत नोव्हेंबरमध्ये दरवर्षी अडीच ते तीन लाख क्विंटल आवक होते. यंदा हे प्रमाण दीड ते पावणे दोन क्विंटलने घटण्याची शक्यता आहे. देशांतर्गत मागणी वाढूनही आवक मंदावली आहे. यामुळे घाऊक बाजारात कांदा दररोज विक्रमी दर गाठत आहे.
गुरूवारी लासलगाव बाजारात उन्हाळ कांद्याला साडेसहा हजार रुपये सरासरी दर मिळाले होते. दुसऱ्या दिवशी त्यात ५०० रुपयांनी भर पडून ते ७०१२ रुपयांवर पोहोचले. नव्या कांद्याला ५४०१ रुपये दर मिळाले. उन्हाळ कांद्याची ६२३ तर नव्या कांद्याची ९१५ क्विंटल आवक होती. आजवरच्या इतिहासात उन्हाळ कांद्याला मिळालेले हे सर्वाधिक दर आहे. जिल्ह्य़ातील इतर बाजार समित्यांमध्ये हीच स्थिती आहे. पिंपळगाव बसवंत बाजार समितीत सरासरी दर ७४७५ रुपये होते. या बाजारात केवळ ९०० क्विंटलची आवक झाली. लेट खरीप कांदा डिसेंबरच्या मध्यानंतर सुरू होईल. तेव्हा हे दर आटोक्यात येतील, असे नाफेडचे माजी उपाध्यक्ष चांगदेवराव होळकर यांनी सांगितले.
