आवक दुपटीने वाढली; निर्यातबंदीचाही परिणाम
नाशिक : सलग दोन महिने सर्वसामान्यांना वाढत्या किमतीने जेरीस आणणाऱ्या कांद्याचे घाऊक बाजारातील दर चार दिवसांत क्विंटलमागे ७०० रुपयांनी गडगडले. जिल्ह्य़ातील बाजार समित्यांमध्ये लाल कांद्याची प्रचंड आवक होत आहे. एकटय़ा लासलगाव बाजार समितीत मंगळवारी ५१ हजार १५६ क्विंटलची विक्रमी आवक झाली. त्यास प्रति क्विंटलला सरासरी १८०० रुपये दर मिळाले. गेल्या शनिवारी हेच दर अडीच हजार रुपये होते.
दिवाळीत अवकाळी पावसाने काढणीवर आलेल्या कांद्याचे अतोनात नुकसान झाले होते. बहुतांश माल खराब झाल्यामुळे बाजारात कांद्याची टंचाई निर्माण झाली. याच काळात कांद्याने कधी नव्हे, इतकी म्हणजे तब्बल १२ हजार रुपये क्विंटलपर्यंत झेप घेतली होती. एक-दीड महिना चढेच राहिलेले दर उशिराच्या खरीप कांद्याची आवक वाढल्यानंतर कमी होत आहेत.
लाल कांद्याला फारसे आयुर्मान नसते. काढणीनंतर तो लगेच बाजारात न्यावा लागतो. सध्या निर्यातीवर बंदी असल्याने देशांतर्गत बाजारपेठ उपलब्ध आहे. त्यात देशातील इतर भागातून कांदा बाजारात येत असल्याने महाराष्ट्राच्या कांद्याची मागणी कमी झाली आहे. या सर्वाचा एकत्रित परिणाम दरावर झाल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.
लासलगाव बाजारात चार दिवसांत आवक दुपटीने वाढली. एक फेब्रुवारीला बाजारात २० हजार ३७७ क्विंटलची आवक झाली होती. मंगळवारी हे प्रमाण ५१ हजार क्विंटलच्या पुढे गेले. त्यास किमान ९०० ते कमाल २१५२ तर सरासरी १८०० रुपये दर मिळाले. अन्य बाजार समित्यांमध्ये वेगळी स्थिती नाही.
शेतकऱ्यांमध्ये असंतोष
मनमाड बाजार समितीत घसरत्या दरामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष धुमसत आहे. या बाजारात साडेआठ हजार क्विंटलची आवक झाली. त्यास सरासरी १७०० रुपये दर मिळाले. घसरत्या दराने आर्थिक समीकरण कोलमडल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. आठ ते दहा दिवसांपासून भावात घसरण सुरू आहे. ते रोखण्यासाठी सरकारी पातळीवर कोणतीही पावले टाकली जात नसल्याची तक्रार शेतकरी करीत आहेत. पुढील काळात घसरण सुरू राहणार असल्याचे निर्यातदार व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.