सटाणा शहरात ५० वर्षांपासून साचलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याच्या दिशेने पाऊले टाकली जात आहेत. नगर परिषदेने एआर एनर्जी लिमिटेडच्या सहकार्याने राबविलेल्या प्रकल्पातून कचऱ्यापासून खतनिर्मिती होणार आहे. या प्रकल्पातून ३५ हजार टन कचऱ्याचे ‘बायोमायनिंग’ होणार असून ५० वर्षांपासून साठून राहिलेल्या कचऱ्याची पुढील सहा महिन्यांत विल्हेवाट लागणार आहे. असा प्रकल्प राबविणारी जिल्ह्यात सटाणा ही पहिलीच नगर परिषद ठरली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सटाणा नगर परिषदेतर्फे सुरू करण्यात आलेल्या कचऱ्याच्या बायोमायनिंग प्रकल्पाचे उद्घाटन आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते, नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. सटाणा शहर स्वच्छता आणि शहरवासीयांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून दररोज कचरा संकलन होणे गरजेचे आहे. परंतु संकलित कचऱ्यावर प्रक्रिया होऊन त्याची विल्हेवाट लागणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे नगर परिषदेने हा प्रकल्प सुरू केला असून शहरवासीयांनीही घरोघरी कचऱ्याचे वर्गीकरण करून घंटागाडीचा वापर कटाक्षाने करावा. या बळावरच सटाणा शहर लवकरच स्वच्छतेबाबत राष्ट्रीय पातळीवरील मानांकन प्राप्त करेल, असा विश्वास मोरे यांनी व्यक्त केला.

या प्रकल्पामुळे शहर स्वच्छतेसाठी मोलाचा हातभार लागणार असून शहरवासीयांनीही आता पुढे येऊन शहर स्वच्छतेशी संबंधित आपली वैयक्तिक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी, असे आवाहनही त्यांनी केले. आमदार बोरसे यांनी शहरवासीयांच्या सेवा सुविधांसाठी शासन स्तरावरून सहकार्य प्राप्त करून दिले जाईल, असे आश्वासन दिले.

सटाणा शहराने स्वच्छतेच्या बाबतीत तीन वर्षांत चांगली कामगिरी केली आहे. शहरवासीयांचे आरोग्य अबाधित राहण्याकरिता नगर परिषदेकडून शहर स्वच्छतेसाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहेत. त्याचाच भाग म्हणून शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी महत्त्वाकांक्षी बायोमायनिंग प्रकल्प कार्यान्वित करण्यात आल्याचे नगराध्यक्ष मोरे यांनी सांगितले. या प्रकल्पातून कचऱ्यापासून खतनिर्मिती होईल. त्यासाठी बसविलेली यंत्रणा कचऱ्यातून प्लास्टिक विलग करेल. प्लास्टिकचा पुनर्वापर किंवा अन्य पद्धतीने विल्हेवाट लावण्याचे नियोजन आहे. यापूर्वीच्या संपूर्ण कचऱ्याची विल्हेवाट लागल्यानंतर नगर परिषदेच्या मालकीची पाच एकर जमीन मोकळी होणार आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Processing of waste collected in satana for 50 years abn