नाशिक : नुकसानग्रस्त भागात आमदार आणि खासदारांनी दौरे सुरू केले आहेत. डॉ. सुभाष भामरे, डॉ. भारती पवार, हेमंत गोडसे या खासदारांसह दिलीप बोरसे, दिलीप बनकर हे आमदार आणि माजी आमदार अनिल कदम यांनी बांधावर जाऊन द्राक्ष बागांसह मका, बाजरी, सोयाबीन, नागली, भात पिकांच्या नुकसानीची पाहणी केल्यावर भयावह स्थिती अधोरेखित झाली. राज्य, केंद्र सरकापर्यंत पाठपुरावा करून नुकसानग्रस्तांना भरपाई मिळवून देण्याकरिता प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. द्राक्ष पिकासमोरील अडचणीवर तात्पुरता इलाज न करता त्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी विशेष कृती कार्यक्रम राबविण्यात येईल. नुकसानग्रस्तांचे पंचनामे पूर्ण करून नुकसानीचा अहवाल शासनाकडे सादर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत त्वरित उपलब्ध करून देण्यासाठी आग्रह धरला जाणार असल्याचे बोरसे, भामरे यांनी सांगितले.

मालेगाव तालुक्यात पावसामुळे शेतीचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. हातात पैसा अडका नसताना ऐन दिवाळीत शेतकऱ्यांवर संकट कोसळले. कृषी, महसूल यंत्रणेने तातडीने पंचनामे करण्याची सूचना ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी केली. नाशिक पूर्व मतदारसंघात पावसामुळे झालेल्या नुकसानीची राहुल ढिकले यांनी तर मालेगाव तालुक्यातील येसगाव, मथुरपाडे, अजंदे गावात मका, बाजरी, द्राक्षाच्या नुकसानीची खा. भारती पवार, आ. सुहास कांदे यांनी पाहणी केली. निफाड तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तातडीने पंचनामे करून त्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आ. दिलीप बनकर यांनी केली.

शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू

बागलाण तालुक्यातील इजमाणे येथील युवा शेतकरी अभिजित धोंडगे यांनी सुमारे २० लाख रुपये खर्च करून निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन घेतले होते. दोन दिवसांपूर्वी बांगलादेशच्या व्यापाऱ्याशी ७० रुपये किलोप्रमाणे सौदा केला होता. मात्र दुर्दैवाने परतीच्या पावसाने होत्याचे नव्हते झाले. सहा एकरवरील सुमारे ४२ टन द्राक्ष पीक अक्षरश: सडून गेले. भयावह स्थिती लोकप्रतिनिधींसमोर कथन करताना धोंडगे यांनी हंबरडा फोडला. आता जगायचे तरी कसे, मुलांचे शिक्षण, पोट कसे भरायचे, हे त्यांचे प्रश्न उपस्थितांच्या अंगावर शहारे आणत होते. द्याने येथील शेतकरी तुषार कापडणीस यांचा १० एकर क्षेत्रावरील नाना पर्पल द्राक्षाचा जागेवर १५० रुपये किलोने सौदा झाला होता. हा माल थेट दुबईला निर्यात होणार होता. मुसळधार पावसाने सुमारे ८० टन द्राक्ष पीक बाधित झाले. आपल्या व्यथा मांडताना अनेकांना अश्रू अनावर झाले.