जळगाव : साधारणपणे तुळशी विवाहानंतर लग्न सराई सुरू होते आणि उन्हाळ्याच्या अखेरीस ती आटोपते. पंचांग आणि दिनदर्शिकांमधील मुहुर्तावर विवाह सोहळे पार पाडण्यासाठी अनेक जण आग्रही असतात. मात्र, नोंदणी विवाहांना कोणताच मुहूर्त, स्थळ आणि काळ लागत नसल्याने, अगदी पितृपक्षातही लग्नांची धामधूम सुरू असल्याचा प्रत्यय जळगावमध्ये आला आहे.
करोनाच्या काळात विवाह समारंभावर अनेक प्रकारचे निर्बंध लागू झाल्यामुळे ५०० पासून हजार लोकांच्या गर्दीला आपोआप मर्यादा आल्या. विवाहासाठी केवळ ५० लोकांच्या उपस्थितीची मर्यादा घातली गेल्याने एकाला बोलावले आणि दुसऱ्याला नाही बोलावले, अशा तक्रारी मात्र सुरू झाल्या. ज्यामुळे जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी दुखावण्याची शक्यता वाढली. त्यावर मार्ग काढण्यासाठी अनेक जोडप्यांनी नंतर करोनाचे कारण पुढे करीत नोंदणी पद्धतीने विवाह करण्यास पसंती दर्शविली.
परिणामी, शासकीय नियमावली आणि अमाप खर्च, या गोष्टी ओघाने कमी झाल्या. अर्थात, करोनामुळे का असेना नोंदणी विवाहांची वाढलेली लोकप्रियता करोना ओसरल्यानंतरही कायम राहिली. अलिकडे पारपत्रासह संपत्तीच्या वाटणीसाठी विवाह प्रमाणपत्र अनिवार्य झाल्याने नोंदणी विवाहांना आणखी चालना मिळाली आहे.
नोंदणी विवाहासाठी काही कायदेशीर अटींची पूर्तता होणे अत्यावश्यक असते. वराचे वय २१ आणि वधुचे वय १८ गरजेचे मानले जाते. दोघेही लग्नाच्या दिवशी अविवाहित आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असणे गरजेचे असते. विशेष विवाह कायद्यांतर्गत विवाह नोंदविण्यासाठी सरकारतर्फे योग्य अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली असते. लग्न करण्यासाठी वधू-वराला कार्यालयात जाऊन विहित नमुन्यामधील नोटिशीचा फॉर्म भरून द्यावा लागतो. हल्ली तर सर्व शासकीय सेवा ऑनलाईन झाल्याने विवाह नोंदणीसाठी जोडप्यांना कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची सुद्धा गरज भासत नाही. सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पडल्यानंतर पक्षकार आणि तीन साक्षीदारांनी स्वाक्षरी केल्यावर थेट विवाह प्रमाणपत्रच हातात पडते.
पावसाळ्यात १०२ जोडप्यांवर अक्षता
जळगावमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील विवाह नोंदणी कार्यालयात जून २०२४ ते जून २०२५ या वर्षभरात तब्बल ४८३ नोंदणी विवाह प्रमाणपत्रे वितरीत झाली होती. पावसाळा सुरू झाल्यानंतरच्या काळात एक जुलै ते १५ सप्टेंबरच्या काळातही १०२ विवाह प्रमाणपत्रे वितरीत झाली. विशेष म्हणजे पितृपक्षात चांगल्या कामांची सुरूवात अनेकांकडून टाळली जाते. मात्र, २० पेक्षा अधिक नोंदणी विवाह पितृपक्षातही उरकण्यात आले.
विवाह इच्छुकांना पूर्वी स्वतः कार्यालयात येऊन विवाह नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागत असे. मात्र, ऑनलाईन सेवा सुरू झाल्यापासून संबंधितांना आता कार्यालयात यावे लागत नाही. सर्व प्रक्रिया सुटसुटीत झाल्याने नोंदणी विवाहांची संख्या वाढली आहे. –जी. पी. राठोड (विशेष विवाह अधिकारी, जळगाव)