नाशिक : महाराष्ट्राचे भरतपूर समजल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य परिसरात उन्हाचा वाढता तडाखा, वातावरणातील बदल यामुळे पक्षी स्थलांतरास सुरुवात झाली आहे. पक्ष्यांनी परतीची वाट धरल्याने वनविभागाकडून पक्षीमित्र असलेल्या मार्गदर्शकांना (गाईड) काम संपल्याने कामावरून काढण्याचे सत्र सुरू केले आहे.
नांदुरमध्यमेश्वर अभयारण्य परिसरात हिवाळय़ात देश, विदेशातून वेगवेगळे पक्षी येतात. यंदा थंडी काहीशी उशिरा सुरू झाल्याने काही पक्षीही उशिराने अभयारण्यात दाखल झाले होते, काहींनी मुक्काम वाढवला. काही पक्ष्यांनी नव्याने या ठिकाणी घरटे बांधली. उन्हाचा तडाखा वाढू लागल्यावर पाण्याची पातळी कमी होण्यास सुरुवात झाली. परिणामी विदेशातून आलेल्या पक्ष्यांनी आपला मुक्काम हलविला आहे. विदेशी पक्ष्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला असताना स्थानिक हळदी कुंकू, कमळपक्षी, जांभळी पानकोंबडी, वारकरी आदी पक्षी या ठिकाणी अजूनही मुक्कामास आहेत. पक्ष्यांचा किलबिलाट कमी होऊ लागल्याने आणि वाढत्या उष्णतेमुळे पक्षी पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांचीही गर्दी कमी होऊ लागली आहे.
दिवसाकाठी बोटावर मोजण्याइतके पर्यटक या ठिकाणी येत आहेत. अशा स्थितीत काम संपल्याने याठिकाणी पक्षी मार्गदर्शक असलेल्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. अभयारण्य परिसरात २० ते ३० वर्ष वयोगटातील १२ ते १५ युवक मार्गदर्शक म्हणून काम करत आहेत. वनविभागाकडून जवळच्या गावातील युवकांना त्यासंदर्भात प्रशिक्षण दिले जाते. या युवकांच्या निलंबनाने अन्य लोकांवर याचा विपरीत परिणाम होण्याची चिन्हे आहेत. पक्षी महोत्सव संपल्यावर या ठिकाणी असलेली कामे थांबली आहेत. वनविभागाची गस्त सुरू असली तरी अभयारण्याच्या पाणथळ भागात मासेमारीचे प्रमाण वाढले आहे. अद्याप रेखांकन झालेले नसून पायवाटांवर गवत वाढले आहे. ज्या ठिकाणी पक्षी पाहण्यासाठी मनोरे तयार केले आहेत. त्या भागात मासेमारी करण्यात येत आहे. या सर्व अडचणींचा विचार न झाल्यास अभयारण्याचा रामसर दर्जा जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
पक्षी मार्गदर्शकांचा करार संपुष्टात
नांदुरमध्यमेश्वर अभयारण्य परिसरात पक्षी मार्गदर्शक म्हणून काम करणाऱ्या युवकांचा करार मार्चमध्ये संपला आहे. यामुळे त्यांना कामावरून कमी केले. त्यांना पुन्हा नियुक्त करण्यासाठी वरिष्ठ स्तरावर पत्र पाठविण्यात आले आहे. वन विभागाची गस्त सातत्याने सुरू असल्याने या भागात मासेमारी होत नाही. ज्या ठिकाणी मासेमारी होते, त्या भागात वनविभाग हस्तक्षेप करू शकत नाही.-एस. एस. देवकर (वन परिक्षेत्र अधिकारी, नांदुरमध्यमेश्वर अभयारण्य)
संग्रहित लेख, दिनांक 5th Apr 2022 रोजी प्रकाशित
पक्ष्यांचे स्थलांतर मार्गदर्शकांच्या मुळावर; नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यातील अनेकजण कामावरून कमी
महाराष्ट्राचे भरतपूर समजल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य परिसरात उन्हाचा वाढता तडाखा, वातावरणातील बदल यामुळे पक्षी स्थलांतरास सुरुवात झाली आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 05-04-2022 at 02:14 IST
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Root bird migration guides many nandurmadhyameshwar sanctuary out of work amy