नागाचा दोन वेळा डंख, स्वत:च दुचाकीवरून रुग्णालय गाठले
येवला : विषारी नागाने दोनदा डंख केल्यानंतर कोणीही गर्भगळीत होणे स्वाभाविकच. परंतु, अशा प्रसंगातही सागर पटेल या तरुणाने हिंमत हारली नाही. धीरोदात्तपणा आणि प्रसंगावधान राखून नागाचे विष शरीरात पसरू नये म्हणून तातडीने पायास दोरी बांधली. त्यानंतर स्वत: दुचाकीवरून मध्यरात्री रुग्णालय गाठले. डॉक्टरांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत तातडीने उपचार सुरू केले आणि ७२ तासांच्या संघर्षांनंतर तो मृत्यूच्या दाढेतून परतला.
येवल्यापासून तीन किलोमीटर अंतरावर गणेशपूर (सुखी) हे गाव आहे. या गावालगत सागर पटेलची शेती आहे. सागर झोपला असताना रात्री दीड वाजता अंधरुणात काहीतरी हालचाल होत असल्याचे त्याला जाणवले. झोपेत त्याला काही समजले नाही. काहीतरी चावल्याची जाणीव झाली आणि सागर खडबडून जागा झाला. बघतो तर पांघरुणात नाग शिरलेला. त्याने हिमतीने शेपूट धरून त्यास बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र फणा काढलेल्या नागाने डंख मारला. सागर जोरात ओरडला. आवाज ऐकून वडील धावले. सागरने वडिलांना त्वरित घरातून दोरी आणण्यास सांगितले.
साप चावलेल्या वरील भागास ती दोरी त्याने करकचून बांधली आणि क्षणाचाही विलंब न करता वृद्ध पित्याला सोबत घेतले. लंगडतच तो दुचाकीवर बसला. वडीलही सोबत होतेच. रस्ता खराब. त्यात डोके जड पडायला लागलेले. डोळ्यांसमोर अंधारी येऊ लागली. हातपाय लटपटत होते. हाताची पकड कमजोर होऊ लागली. आपण दवाखान्यात पोहचतो की नाही, असा विचार सागरच्या मनात आला. तरीही हिंमत न हरता दहा मिनिटांत कसेबसे रुग्णालय गाठले. डॉक्टर स्वप्निल शहा यांनी डॉक्टर शरद गायकवाड यांच्या मदतीने त्वरित उपचार सुरू केले. ७२ तासांच्या उपचारांनंतर सागरची प्रकृती स्थिरावली. सलग दोन वेळा सर्पदंश होऊनही घाबरून न जाता सावधानता बाळगल्याने त्याचे प्राण वाचले.
सागर हा येवल्यातील र्मचट बँकेत नोकरी करतो. वृद्ध आई-वडील, पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. सागरच्या धाडसाचे त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉ. स्वप्नील शहा आणि डॉ. शरद गायकवाड यांनी कौतुक केले. सागरने केलेल्या वर्णनानुसार नाग तीन ते पाच फुटाचा होता. दवाखान्यात पोहोचण्यास सागरने उशीर केला असता तर आम्ही काही करू शकलो नसतो, असे डॉक्टरांनी सांगितले.
सावधानता गरजेची
साप हा निशाचर असल्याने विशेषत: रात्री फिरताना सोबत बॅटरी हवी. सावधानता बाळगणे गरजेचे आहे. जिल्ह्य़ात आढळणाऱ्या सापाच्या ३३ पैकी केवळ सहा प्रजाती विषारी आहेत. अनेकदा अज्ञान, भीतीमुळे रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो. सापांच्या विषारी, बिनविषारी जाती, हाताळणी, प्रथमोपचार याविषयी मार्गदर्शन आणि प्रबोधनाची गरज आहे. अनेकदा रुग्ण वैद्यकीय उपचार न घेता मंदिरात किंवा भोंदूबाबाकडे जातात. वैद्यकीय उपचारास विलंब होऊन चुकीच्या उपचाराने रुग्ण दगावण्याची शक्यता असते.