मालेगाव : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीनिमित्त विविध राजकीय व सामाजिक संघटना तसेच मान्यवरांच्या हस्ते येथील मोसम पुलावरील महात्मा गांधींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या निमित्ताने समाजवादी पार्टीतर्फे नथुराम गोडसे यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली. सर्वांचे हित साधणारी महात्मा गांधी यांची सर्वसमावेशक विचारधारा जीवंत राहिली पाहिजे,अशी भावना यावेळी बोलताना समाजवादी पार्टीच्या युवा शाखेचे प्रदेश सरचिटणीस मुस्तकीम डिग्निटी यांनी व्यक्त केली.

जयंतीच्या निमित्ताने महापालिकेतर्फे महात्मा गांधी पुतळ्यास विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. राष्ट्रपित्याला अभिवादन करण्यासाठी लोकांची सकाळपासूनच गर्दी झाली होती. महापालिका आयुक्त तथा प्रशासक रवींद्र जाधव यांनी मोसम पुलावरील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महात्मा गांधींच्या स्मृतींना अभिवादन केले. समाजवादी पार्टीतर्फे महात्मा गांधी यांना अभिवादन केल्यानंतर ‘महात्मा गांधी जिंदाबाद, नथुराम गोडसे मुर्दाबाद’ अशा घोषणा देण्यात आल्या.

याप्रसंगी बोलताना पक्षाचे नेते मुस्तकीम डिग्निटी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व केंद्रातील भाजप सरकारच्या कार्यपद्धतीबद्दल ताशेरे ओढले. ज्यांच्या विचारधारेमुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले त्या महात्मा गांधी यांची हत्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेतील नथुराम गोडसे यांच्याकडून केली गेली. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत अनेकांना हौतात्म्य पत्करावे लागले, अनेकांना हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. या स्वातंत्र्य चळवळीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग नव्हता.

आता भाजपच्या निमित्ताने याच विचारधारेने देशावर हुकूमत मिळवली असून ही विचारधारा विशिष्ट समुदायाला जाणून बुजून ‘लक्ष्य’ करीत आहे, अशी टीका डिग्निटी यांनी केली. ज्या महात्मा गांधी यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा मार्ग दाखवला ते आंदोलन करण्याची आज सोय उरलेली नाही. असे आंदोलन करताना दहा वेळा विचार करावा लागतो. अनेकदा आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल करून छळवाद केला जातो, असेही डिग्निटी यांनी नमूद केले.

नथुराम गोडसे यांना मानणाऱ्यांकडून ज्याप्रमाणे महात्मा गांधींची अवहेलना केली गेली, तसे मुसलमानांनी देखील त्यांना समजून घेतले नाही, अशी खंत व्यक्त करत आम्हाला ना मुस्लिम लीगची विचारधारा मान्य आहे,ना हिंदू महासभेची असे डिग्निटी म्हणाले. माजी आमदार व इस्लाम पार्टीचे संस्थापक आसिफ शेख यांनी देखील महात्मा गांधी यांना अभिवादन केले. सद्य:स्थितीत दोन समाजात तेढ निर्माण करून राजकारण केले जात आहे, अशी टीका करत संविधानावर विश्वास असणाऱ्या नागरिकांनी हा देश महात्मा गांधी यांच्या विचारांवर चालावा की नथुराम गोडसे यांच्या विचारांवर,असा विचार करण्याची वेळ आता आली आहे,असे यावेळी बोलताना शेख म्हणाले.