कुटुंबीयांना शिवसेनेतर्फे पाच लाखांची मदत जाहीर; स्मारक उभारणार
जम्मू-काश्मीरच्या कूपवाडा क्षेत्रात दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलेल्या नायक शंकर शिंदे यांच्या पार्थिवावर सोमवारी सकाळी चांदवड तालुक्यातील भयाळे या मूळ गावी लष्करी इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांचा दीड वर्षीय मुलगा ओम आणि भावाच्या हस्ते भडाग्नी देण्यात आला. पार्थिवाकडे पाहत बाबा बाबा..ची आर्त हाक मारणाऱ्या ओमला पाहून हजारोंच्या जनसमुदायास अश्रू रोखणे अनावर झाले. देशासाठी वीरमरण पत्करणाऱ्या शहीद शंकर शिंदे यांच्या कुटुंबीयांना शिवसेनेच्या वतीने पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. तसेच त्यांचे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन मान्यवरांनी दिले.
चांदवड तालुक्यातील भयाळे हे सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जाते. सैन्य दलात कार्यरत स्थानिक तरुणांची संख्या मोठी आहे. दहशतवाद्यांशी दोन हात करताना वीरमरण पत्करणाऱ्या शिंदे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो नागरिक या गावाकडे लोटले. त्यात महिलांची संख्याही मोठी होती. शहीद शंकर शिंदे याचे पार्थिव सकाळी भयाळे येथे आणण्यात आले. या वेळी सहकार राज्यमंत्री दादा भुसे, आ. डॉ. राहुल आहेर, खा. हेमंत गोडसे, समीर चव्हाण आदींसह शासकीय अधिकारी तसेच विविध सामाजिक संस्था, नातेवाईक व नागरिकांनी पुष्पचक्र अर्पण करत श्रद्धांजली वाहिली. लष्करी जवानांनी मानवंदना देत पुष्पचक्र अर्पण करून आपल्या धाडसी योद्धय़ाला श्रद्धांजली वाहिली. अंत्यसंस्कारा वेळचे दृश्य हृदय हेलावणारे होते. देशासाठी पुत्र शहीद झाल्याचा अभिमान तर दुसरीकडे पुत्र वियोगाचे दु:ख कुटुंबीयांच्या चेहऱ्यावर जाणवत होते.
शहीद शिंदे यांचा अवघा दीड वर्षांचा मुलगा ओम आणि सहा वर्षांची मुलगी वैष्णवी, वीरपत्नी सविता आणि आई-वडिलांच्या भावना अनावर होत असताना उपस्थितांचे मन हेलावून गेले. ओमला इतकी गर्दी का लोटली हे समजणेही अवघड होते. सर्वच शोकाकुल असल्याने वडिलांच्या पार्थिवाकडे पाहत बाबा बाबा.. अशी हाक तो मारत होता. ज्या वेळी पार्थिवाला भडाग्नी देण्यासाठी चिमुकल्याला घेऊन काका पुढे सरकले, तेव्हा उपस्थितांना भावना अनावर झाल्या. हा क्षण कित्येकांना पाहणे अवघड ठरले. इवल्याशा चिमुरडय़ावर आलेली वेळ पाहून ‘शहीद शंकर शिंदे अमर रहे..’च्या घोषणा देणारा जनसमुदाय क्षणभर स्तब्ध झाला. अनेकांच्या अश्रूंचा बांध फुटला. अतिशय शोकाकुल वातावरणात अंतिम संस्कार करण्यात आले. या वेळी उपस्थित सर्वाच्या वतीने सहकार राज्यमंत्री दादा भुसे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. शंकर शिंदे यांना देशासाठी लढताना वीरमरण प्राप्त झाले. त्यांच्या कुटुंबीयांमागे शासन, शिवसेना व नागरिक खंबीरपणे उभे राहणार असल्याचे भुसे यांनी सांगितले. शिवसेनेतर्फे शिंदे यांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. शहीद शिंदे यांचे स्मारक उभारण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. या स्मारकासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्याचे आश्वासन भुसे यांनी दिले.