वारंवार तक्रारी करूनही आपल्या मागण्यांकडे लक्ष दिले जात नसल्याच्या निषेधार्थ अखेर रविवारी धुळे जिल्ह्य़ातील साक्री तालुक्यातील आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांनी थेट पदयात्रा करत आदिवासी विकास आयुक्तालयावर धडक दिली. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत न हटण्याचा इशारा या विद्यार्थ्यांनी दिला आहे.
साक्री तालुक्यातील सीतामाता येथील शासकीय आश्रमशाळा वसतिगृहातील हे विद्यार्थी आहेत. संपूर्ण साक्री तालुक्यातील आदिवासी वसतिगृहांना सुविधा मिळाव्यात, वसतिगृहांना संगणक संच पुरविण्यात यावेत, सीतामाता येथील मुलींच्या वसतिगृह इमारतीची अवस्था बिकट झाली असून नवीन इमारत मिळावी, सर्व वसतिगृहांना टीव्ही संच पुरविण्यात यावा, ग्रंथालय कक्ष निर्माण करावा, आदिवासी विद्यार्थ्यांना त्वरित शिष्यवृत्ती मिळावी, छत्री, रेनकोटचे देयक देण्यात यावे, बादली, ताट, वाटी, ग्लास, टेबल-खुर्ची, क्रीडा साहित्य अशा सर्व सुविधा द्याव्यात आदी मागण्या या विद्यार्थ्यांच्या आहेत. याआधी ४ जानेवारीस विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. त्या वेळी त्यांना २० जानेवारीपर्यंत मागण्या मान्य करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले होते. परंतु, त्यानंतरही कोणतीच कार्यवाही न झाल्याने अखेर विद्यार्थ्यांनी २२ जानेवारीस सायंकाळी सहा वाजेपासून साक्री येथून नाशिककडे प्रस्थान केले. रविवारी रात्री पावणेआठच्या सुमारास ते नाशिक येथील आदिवासी विकास आयुक्तालयाच्या आवारात पोहोचले. आवारातच त्यांनी ठिय्या दिला असून सुमारे ७५ विद्यार्थी असून त्यात ४५ विद्यार्थिनींचा समावेश आहे.