मालेगाव : एका वाहनाच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात समोरुन आलेल्या मोटारीला वाचविताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने गुजरात परिवहन महामंडळाची बस उलटली. शुक्रवारी सटाणा – मालेगाव रस्त्यावर हा अपघात झाला. या अपघातात दोन महिला प्रवासी किरकोळ जखमी झाल्या.

गुजरात परिवहन महामंडळाच्या पाटण- मालेगाव या बसला हा अपघात झाला. बस सटाण्याहून मालेगावकडे निघाल्यावर चिंचावड फाट्याजवळ एका मालमोटारीच्या पुढे जात असताना समोरुन भरधाव मोटार येत असल्याचे बस चालकाच्या लक्षात आले. त्याने अपघात टाळण्यासाठी प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या उजव्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. त्यात चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला उलटली. बसमध्ये चालक, वाहक आणि अन्य सात प्रवासी होते. त्यात हदिमाबिबी अब्बास मिया (६०) आणि अन्सारी मियाजबानो मोहंमद रफिक (३९, दोन्ही रा.अहमदाबाद) या महिला किरकोळ जखमी झाल्या. त्यांना मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघातानंतर स्थानिक शेतकरी व ग्रामस्थ मदत कार्यासाठी धावून आले. अपघाताची माहिती मिळाल्यावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या सटाणा आगाराचे वाहतूक निरीक्षक आकाश बस्ते यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. अपघातात बसचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातस्थळी रस्त्याच्या कडेला मोठी झाडे आहेत.

मालेगाव-सटाणा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक वाढली आहे. परंतु, तुलनेत रस्ता अरुंद आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे आहेत. चालकांना खड्डे टाळण्यासाठी अनेकदा कसरत करावी लागते. त्यामुळे या रस्त्यावर वारंवार अपघात घडत असतात. वाढती रहदारी व अरुंद रस्ता यामुळे अपघातांना निमंत्रण मिळत असल्याने या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात यावे, ही मागणी सातत्याने केली जात आहे. मात्र राजकीय व प्रशासकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याची नागरिकांची तक्रार आहे. दरम्यान अपघात प्रकरणी सटाणा पोलीस ठाण्यात बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.