महापालिकेचे सोयीस्कर दुर्लक्ष

नाशिक : पेठ रस्त्यावरील आरटीओ कॉलनी समोरील परिसरात चवली दलालांकडून होणारी कृषिमाल विक्री स्थानिक नागरिकांसह पोलीस यंत्रणेसाठी डोकेदुखी ठरली आहे. संबंधितांच्या वाहनांमुळे सायंकाळनंतर नाशिक-पेठ रस्त्यासह कॉलनी रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी होते. बाजार समितीने शरदचंद्र पवार मार्केटच्या बाजारात जागा दिली. तसेच किरकोळ विक्रेत्यांना महापालिकेने निश्चित केलेल्या जागेत विक्री करण्यास सांगूनही संबंधितांनी प्रतिसाद दिला नाही. परिणामी, अनधिकृतपणे कृषिमाल विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना पिटाळण्यासाठी पोलिसांना दररोज कसरत करावी लागत आहे.

करोनाच्या संकटात पंचवटी बाजार समितीच्या आवारात किरकोळ विक्री बंद झाली आणि चवली दलालांचा बाजार थेट पेठ रस्त्यावरील बाजार समितीच्या शरदचंद्र पवार मार्केटच्या आसपासच्या परिसरात स्थिरावला. सायंकाळी पाचनंतर आरटीओ कार्यालयाच्या सभोवतालचा परिसर आणि अश्वमेधनगर, कर्णनगरचे रस्ते १५० ते २०० चवली दलालांसह वाहनांनी व्यापलेला असतो. संबंधितांकडून खाद्य पदार्थ विक्रेते, हॉटेल व्यावसायिक आणि तत्सम ग्राहकांना मालाची विक्री केली जाते. त्यांच्या गर्दीमुळे पेठ रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत होते. याच परिसरात नामको चॅरिटेबल ट्रस्टचे कर्करोग रुग्णालय आहे. त्याभोवती विक्रेत्यांचा वाहनांसह गराडा पडलेला असतो. रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांना अनधिकृत भाजी बाजारातील गोंधळाला तोंड द्यावे लागते. महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने परिसरात कठोर कारवाई केल्याची माहिती नाही. गर्दी हटविण्यासाठी पोलिसांना रोज प्रयत्न करावे लागतात. पोलीस वाहनाची चाहूल लागली की, चवली दलाल, विक्रेते एकाचवेळी आपली वाहने काढतात. माल गाडीत टाकून पेठ रोड, अश्वमेधनगर, कर्णनगरमधील कॉलनी रस्त्यांच्या मार्गाने पळ काढतात. या गोंधळात अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. पोलिसांचे वाहन संबंधितांना पिटाळून गेले की, अन्य मार्गाने विक्रेते पुन्हा या परिसरात डेरा टाकतात. रस्ते त्यांच्या वाहनांनी व्यापले जातात. यामुळे स्थानिक नागरिक त्रस्तावले आहे. सायंकाळनंतर घराबाहेर पडणे त्यांच्यासाठी अग्निदिव्य बनले आहे. महापालिका कारवाई करत नसल्याने संबंधितांचे फावल्याची तक्रार केली जात आहे.

चवली दलाल म्हणजे कोण ?

बाजार समितीत शेतकऱ्यांकडून कमी प्रतीचा माल खरेदी करायचा आणि तो त्याच ठिकाणी हॉटेल, खाद्य पदार्थ विक्रेते वा सामान्य नागरिकांना विक्री करणारा घटक म्हणजे चवली दलाल. त्याचा बाजार समितीशी कोणताही संबंध नाही. त्याच्याकडे माल खरेदी-विक्रीचा परवानाही नसतो, असे बाजार समितीचे म्हणणे आहे.

पेठ रस्त्यासह आसपासच्या भागात कृषिमाल विक्री करून वाहतुकीस अडथळे निर्माण करू नये, यासाठी बाजार समितीने रस्त्यावर कृषिमाल विकणाऱ्या शेतकऱ्यांसाठी पेठ रस्त्यावरील शरदचंद्र पवार मार्केटमध्ये जागा उपलब्ध केली आहे. या संदर्भात समितीने पोलिसांनाही पत्र दिले. चवली दलालांना महापालिकेने निश्चित केलेल्या जागेत विक्री करावी, असे सुचविण्यात आले. त्यालाही संबंधितांनी प्रतिसाद दिला नाही. पोलीस, महापालिका आणि बाजार समितीने प्रयत्न करूनही संबंधितांकडून आरटीओ समोरील परिसरात माल विक्री होत आहे.

– संपत सकाळे (सभापती, नाशिक बाजार समिती)